पहिला बायो डिझेल पंपाचे उद्घाटन
By Admin | Published: January 24, 2015 01:45 AM2015-01-24T01:45:05+5:302015-01-24T01:45:05+5:30
केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खालापूर येथे ईडिझेल कंपनीच्या बायो डिझेल पंपाचे उद्घाटन केले
खालापूर : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खालापूर येथे ईडिझेल कंपनीच्या बायो डिझेल पंपाचे उद्घाटन केले. बायो डिझेलची विक्री करणारा देशातील हा पहिलाच पंप असल्याची माहिती देताना पंतप्रधानांच्या मेक ईन इंडियाच्या घोषणेनुसार संपूर्ण स्वदेशी तत्वावर चालणारा हा प्रकल्प आहे, असे गडकरी यांनी सांगितले. हे डिझेल जंगली वनस्पती आणि फळापासून तयार केले जाते तसेच अधिक कार्यक्षमते सोबत अन्य कंपन्यांच्या तुलनेत या डिझेलची किंमत पाच रुपये स्वस्त आहे. या इंधनाच्या वापरामुळे प्रदुषण कमी होते त्या कारणे मोटारवाहन अधिनियमात बदल करुन अशा स्वरुपाचे इंधन वापरणाऱ्यांना करात सवलत देण्याचा मनोदय गडकरींनी व्यक्त केला.
प्रदूषण मुक्त वाहतूक व्हावी या दृष्टीने देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने बायो डिझेलचे पंप आता ठिकठिकाणी निर्माण होणार असल्याने तेथूनच प्रत्येक वाहन धारकाने इंधन भरावे असे आवाहन गडकरींनी केले. साखर कारखान्याच्या बाय प्रोडक्टपासून तसेच वाया गेलेल्या खाद्य तेलावर प्रक्रिया करुन या इंधनाची निर्मिती होते त्यामुळे रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर महानगर पालिकेने प्रायोगिक तत्वावर बायो इंधनाचा यशस्वी वापर केलेला आहे असे सांगताना नवोदित उद्योजकांनी अशा इंधनाचे प्रकल्प सुरु करावेत असे आवाहन गडकरी यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर असलेल्या खालापूर फाटा येथे आयोजित केलेल्या उद्घाटन कार्यक्रमासाठी खा. श्रीरंग बारणे, पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, माजी खा. रामशेठ ठाकूर, खोपोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)