मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सुविधा दिमाखात सुरू झाली. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत लोकमत समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात गुरुवारी उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक आणि एसटी उपाध्यक्ष रणजित सिंह देओल उपस्थित होते.राज्यातील खेडोपाडी एसटी सेवा कार्यरत आहे. राज्यातील एसटी सेवांचे नियमन आणि वेळापत्रक यांची चौकशीबाबत माहिती प्रवाशांना मिळेल. त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण देखील कॉल सेंटरच्या मार्फत करण्यात येणार आहे. एसटीमध्ये योग्य बदल घडवण्यासाठी प्रवाशांच्या सूचना देखी कॉल सेंटरच्या माध्यमाने स्वीकारण्यात येणार आहे.एसटी प्रशासनाच्या कॉल सेंटरला लोकमत समूहाचे समूह संपादक यांनी पहिला फोन केला. यावेळी कॉल सेंटर प्रतिनिधीला रायकर सरांनी अभिनंदन केले. त्याच बरोबर ही सेवा अधिकाधिक चांगली आणि अविरत कशी सुरू राहील, याबाबत सूचना केल्या.
प्रशासन गतिमान होणार कॉल सेंटरमुळे एसटी प्रशासन गतिमान होणार आहे . एका वेळी एका मिनिटात 120 कस्टमर कॉल अटेंड करण्यात येणार आहे, तक्रारदारचे म्हणणे संबंधित विभागाकडून सोडवण्यासाठी कॉल सेंटरचा मुख्य हेतू असणार आहे. कर्मचा-यांनी देखील आपल्या अधिकारांच्या बाबतीत तक्रारी येथे स्वीकारण्यात येणार आहे. यामुळे प्रशासन आणि तक्रारदार यांच्यातील दुरावा मिटणार असून एसटी प्रशासनाला अधिक गतिमान करण्यास वाव मिळणार आहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष