वाढत्या उन्हाने प्राण्यांना आजार
By admin | Published: May 17, 2016 02:36 AM2016-05-17T02:36:07+5:302016-05-17T02:36:07+5:30
वातावरणातील बदल व वाढते ऊन पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
पिंपरी : वातावरणातील बदल व वाढते ऊन पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. उष्णतेमुळे पाळीव प्राण्यांमध्ये गॅस्ट्रो, श्वसनाचे विकार, लाळ गळणे, डोळे लाल होणे, पचनसंस्थेचे असे विविध आजार दिसून येत आहेत. महापालिका पशुवैद्यकीय दवाखान्यात उष्णतेमुळे मे महिना अखेरपर्यंत ३५९० पाळीव प्राण्यांवर उपचार झाले आहेत. त्यातील पन्नासच्या वर पाळीव प्राणी उष्माघातामुळे दगावले आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय दवाखान्यात कुत्रा, मांजर, विविध प्रकारचे प्राणी-पक्षी, ससे, कासव आदी पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात. यामध्ये देशी-विदेशी प्राण्यांचादेखील समावेश आहे. सध्याचे कमाल तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान हे
पाळीव प्राण्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे. पाळीव प्राण्यांसाठी २७ डिग्री सेल्सिअसच्या पुढील तापमान शरीरासाठी घातक आहे. त्यासाठी पाळीव प्राण्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते.
उपचारासाठी आलेल्या बहुतांशी प्राण्यांच्या शरीरात पाणी कमी पडल्याने जास्त आजार उद्भवले आहेत. पाण्याचा अंश कमी असलेले पदार्थ प्राण्यांना दिल्याने ते घातक ठरले आहेत. त्यामुळे मूत्राशयाचे आजार बऱ्याच प्राण्यांमध्ये दिसून आले आहेत. पाळीव प्राण्यांना पोषक आहार न मिळाल्याने, तसेच बाजारातील हलक्या दर्जाचा आहार दिल्यानेही बऱ्याच प्राण्यांना पोटाचे विकार झाले आहेत. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांना कातडीचे, कानाचे, पचनसंस्थेचे विकारही जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामध्ये काळ्या रंगाच्या कुत्र्याला हे विकार जास्त झाले आहेत, तर पचनइंद्रियाचे विकार अल्सेशन, सेंट बर्नाड, पग, डायलेमिशन, बुलडॉग, बॉक्सर या कुत्र्याच्या जातीतील प्राण्यांना संसर्ग जलद झालेला आहे. (प्रतिनिधी)