'इंदू सरकार' विरोधात काँग्रेस आक्रमक; सिनेमाचे शो पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 10:51 AM2017-07-28T10:51:55+5:302017-07-28T12:12:00+5:30

indauu-sarakaara-vairaodhaata-kaangaraesa-akaramaka-sainaemaacae-sao-paadalae-banda | 'इंदू सरकार' विरोधात काँग्रेस आक्रमक; सिनेमाचे शो पाडले बंद

'इंदू सरकार' विरोधात काँग्रेस आक्रमक; सिनेमाचे शो पाडले बंद

Next
ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पाहायला मिळतो आहेविरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत.

मुंबई, दि. 28- मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला काँग्रेसकडून विरोध होताना पाहायला मिळतो आहे. विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत. ठाणे, जळगाव तसंच नाशिकमध्ये सिनेमाला जिल्हा काँग्रेसकडून विरोध केला जातो आहे. ठाण्यामध्ये आज सकाळी असणारा सिनेमाचा शो काँग्रेसकडून बंद करण्यात आला. तर नाशिकमधील फेम थिएटरसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहेत. जळगावमधील काही सिनेमागृहामधील सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. तर नांदेडमध्येही काँग्रेसच्या विरोधानंतर सिनेमाचा पहिला शो रद्द करण्यात आला आहे. कल्याणच्या आयनॉक्स थिएटरमधील शोही बंद पाडण्यात आला आहे. कल्याणमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे. कल्याणच्या मेट्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये सकाळी १०.१५ मिनिटांचा हा पहिला शो होता. हा शो सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “मोदी सरकार हाय हाय, मधुर भांडारकर हाय हाय..जब ताक सूरज चांद रहेजा इंदिरा तेरा नाम रहेगा” अशा घोषणा देत हा शो बंद पाडला. तसेच मधुर भांडारकरच्या फोटोला चपला मारून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला. भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात आले असून हा मधुर नव्हे तर मोदी भांडारकर असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी  बोलताना केली. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.                        

याआधीही सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान काँग्रेसकडून सिनेमाला विरोध झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उढळून लावल्या होत्या.

पुण्यात एका हॉटेलमध्ये सिनेमाची पत्रकार परिषद सुरु असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली होती. 

सुप्रीम कोर्टाचा सिनेमा प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल
सुप्रीम कोर्टाने इंदू सरकार या सिनेमाच्या प्रदर्शनात येणारे अडथळे हटवत सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनाला मंजूरी दिली असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शुक्रवारीच सिनेमा प्रदर्शित झाल आहे.स्वत:ला संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या सिनेमाचं प्रदर्शन थांबविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुरूवारी या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने प्रिया पॉल यांची याचिका रद्द केली. 
न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांच्या खंडपीठाने म्हंटलं, मधूर भांडारकर यांचा इंदू सरकार हा सिनेमा  1975-77च्या आणीबाणीवर आधारीत आहे. पण हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीने 'काल्पनिक अभिव्यक्ती' असून हा सिनेमा प्रदर्शन होऊ न देण्याचं कोणतंही कारण नाही. तर दुसरीकडे, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेलं दृश्य सिनेमातून काढून टाकलं असून हा सिनेमा पूर्णपणे साफ आहे. कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीबरोबर याचा काहीही संबंध नसल्याचं मधूर भांडारकर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. 
इंदू सरकार हा सिनेमा कायद्याच्यादृष्टीत पूर्णपणे काल्पनिक असून सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचं कोणतंही कारण नाही, असं न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितलं.

Web Title: indauu-sarakaara-vairaodhaata-kaangaraesa-akaramaka-sainaemaacae-sao-paadalae-banda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.