लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवलेल्या कोविड पॉझिटिव्हच्या ५० टक्के सॅम्पल्समध्ये SARS-CoV-2 नावाचा नवा आणि अत्यंत संसर्गजन्य असा भारतीय प्रकारचा विषाणू आढळला आहे. या विषाणूच्या प्रकाराला B.1.617 म्हटले जात आहे. बहुतांश नमुने विदर्भातील आहेत आणि मुंबईत शहरातून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही नमुन्यात आतापर्यंत B.1.617 प्रकारचा विषाणू आढळलेला नाही. सॅम्पल्सची जिनोमिक सिक्वेंसिंग करणाऱ्या दहा प्रयोगशाळांचा ग्रुप INSACOG शास्त्रज्ञांनी याची माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत संपूर्ण जिनोम सिक्वेंसिंग प्रोजेक्टबद्दल अधिक विस्तृत माहिती दिलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १३ हजार ६१४ नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी दहा INSACOG प्रयोगशाळांना पाठवले गेले होते. यापैकी १ हजार १८९ सॅम्पल SARS COV-२ प्रकारचे आढळून आले, जे भारतात चिंतेचा विषय आहेत. यामध्ये यूके वेरिएंटचे १ हजार १०९, दक्षिण आफ्रिकी वेरिएंटचे ७९ नमुने आणि ब्राझीलच्या एका नमुन्याचा समावेश आहे.
जिनोमिक सिक्वेंसिंग म्हणजे काय?nकोरोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली आहे का, हे ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे जिनोम सिक्वेंसिंग होय. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या प्रक्रियेमुळे विषाणू कुठे आणि किती पसरला याची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते. देशातील महत्त्वाच्या प्रयोगशाळांत जिनोम सिक्वेंसिंगसाठी आलेल्या नमुन्यांचा अभ्यास युद्धस्तरावर सुरू आहे. विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झाला आहे का, हे शोधण्यासाठी जुना आणि नवीन दोन्ही विषाणूंना मॅच केले जाते. जिनोम सिक्वेंसिंगमध्ये बदल जास्त दिसून आला तर, नवीन प्रकारचा स्ट्रेन असल्याचे समजले जाते.