वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषण

By admin | Published: April 4, 2017 03:51 AM2017-04-04T03:51:09+5:302017-04-04T03:51:09+5:30

वीटभट्ट्यांना मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि दगडी कोळशाची गरज लागते

Industrial pollution through brickbats | वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषण

वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषण

Next

सिकंदर अनवारे,
दासगाव- वीटभट्ट्यांना मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि दगडी कोळशाची गरज लागते. लाकूड आणि दगडी कोळसा व्यावसायिकदृष्ट्या महाग पडत असल्याने महाड औद्योगिक वसाहतीतील हितकरी फॅब्रिक्स या कार्पेट बनवणाऱ्या कारखान्यातील टाकाऊ माल सरळ वीटभट्ट्यांवर जाळण्यासाठी टाकण्यात आला आहे. वीटभट्ट्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण होत असले तरी या फॅब्रिक्स कारखान्यातील हे कार्पेट वीटभट्टीमध्ये जाळल्यामुळे वायुप्रदूषण अधिक घातक आणि धोकादायक होणार आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील हितकरी फॅब्रिक्स नावाचा कार्पेट बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या गाड्यांसाठी आणि घरांमधील वापरण्यासाठी विविध रंगाचे आणि टाकाऊ कार्पेट बनवले जातात. फायबरचा धागा आणि पेट्रोलियमयुक्त गम याचा वापर करून हे कार्पेट तयार केले जात असल्याने या कार्पेटचे विघटन होत नाही. हे कार्पेट जाळल्यास नाकाला झिणझिण्या आणणारा धूर आणि मोठ्या प्रमाणात कार्बन तयार होतो. यामुळे हितकरी कारखान्यामधून निर्माण झालेल्या टाकाऊ फायबरचा अधिक प्रमाणात वापर आणि विघटन होत नसल्याने कारखाना आवार आणि परिसरात पडीक आहे. गेलीअनेक वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ या टाकाऊ कार्पेटची विल्हेवाट लावण्यासाठी वारंवार कारखान व्यवस्थापकाला सूचना केल्या आहेत. हितकरी फॅब्रिक्समधील हे टाकाऊ कार्पेटचे तुकडे आता तालुक्यातील वीटभट्ट्यांवर पोहचवले जात आहेत. वीटभट्ट्यांचा दर्जेदार वीट तयार करण्यासाठी अधिक वेळ जळणारा घटक लागतो. दगडी कोळसा अधिक काळ जळत असल्याने त्याचा वापर केला जातो. मात्र दगडी कोळशांचा दर जास्त असल्याने तो वीटभट्टी व्यावसायिकांना परवडत नाही. हितकरी कारखान्यांचे हे टाकाऊ कार्पेट दगडी कोळशाप्रमाणे चांगली उष्णता आणि अधिक काळ जळणारा असून या कारखान्याकडून वीटभट्ट्यांवर फुकट पोहच करण्यात येत असल्याने वीटभट्ट्यांवर या कार्पेटचा पर्यायी वापर सुरू झाला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या दासगाव खाडी पट्टा, भावे, माटवण, धारवली, वरंध आदी तालुक्यातील ठिकाणी वीटभट्ट्यांवर हे टाकाऊ कार्पेट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीटभट्ट्या जाळण्यासाठी कार्पेटच्या वापरावर बंदी घातली असून हितकरी कारखान्याला हा आगाऊ माल वीटभट्ट्यांवर उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप या कारखान्याने हे कार्पेट न उचलता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषणाला प्रारंभ होणार आहे.
>प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून वीटभट्ट्यांची पाहणी केली आहे. हितकरी कारखान्यामधील टाकाऊ कार्पेट वीटभट्ट्यांवर आढळून आले. अशा प्रकारे विल्हेवाट लावणे हे प्रदूषणकारक आहे. हितकारी कारखान्याचा हा प्रकार सराईत असण्याने या कारखान्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे बंदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी,
प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड

Web Title: Industrial pollution through brickbats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.