नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:03 AM2017-10-29T05:03:55+5:302017-10-29T05:04:10+5:30
केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात. त्यापेक्षा आक्रमक होऊन विरोधकांचे हल्ले परतवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारविरोधात थोडेही मत व्यक्त झाले तर आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या सुरात सूर मिसळतात हे योग्य नाही. आपलेच कार्यकर्ते सरकारवर टीका करू लागले आहेत. हे प्रकार थांबविले पाहिजेत. पक्ष व सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवारी जिल्ह्याजिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करावे, ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल
जल्लोष करण्यापेक्षा सामान्य माणसांशी संवाद साधणारे कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना खा. दानवे यांनी केल्या.