नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. संघाचे जेष्ठ पदाधिकारी शहरात नसल्याने यावेळी नवीन आमदारांची स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर ‘ओळख परेड’ झाली. शिवाय त्यांना संघ विचारधारेसंदर्भात बौद्धिकदेखील देण्यात आले.संघातर्फे डिसेंबरच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु यामुळे नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून ऐनवेळी हा वर्ग रद्द करण्यात आला. अखेर गुरुवारचा मुहूर्त संघस्थानाच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला. सकाळी ८.३० नंतर आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे चहापान झाले. यानंतर येथील महर्षी व्यास सभागृहात आमदारांचे नागपूर महानगर संघचालक डॉ.दिलीप गुप्ता यांनी ‘बौद्धिक’ घेतले. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली.
मंत्री-आमदारांना संघाचे बौद्धिक
By admin | Published: December 19, 2014 4:53 AM