मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत परिषदेने नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे. या पद्धतीनुसार उत्तरसूची जाहीर झाल्यानंतर अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. या निकालावर विद्यार्थी, पालकांनी आक्षेप मागवून हे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामधील चुकांबाबत विद्यार्थी, पालकांकडून आक्षेप घेण्यात येत. या आक्षेपांचा विचार करण्यासाठी गुणपडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येईल. यामध्ये अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरत. त्यामुळे यंदापासून शिष्यवृत्तीच्या ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा एकही अधिकच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाणार नसल्याचा निर्णय राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेने निकाल जाहीर करण्यापूर्वी गुणपडताळणी केल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेने परीक्षेची उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. सूचीनंतर परिषदेकडून अंतरिम निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. त्या निकालावर आक्षेप मागविल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज निकाली काढून अंतिम निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीचा जाहीर होणार अंतरिम निकाल
By admin | Published: May 11, 2015 3:59 AM