पंतप्रधान मोदींच्या 'पाक' संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 01:09 AM2018-10-28T01:09:42+5:302018-10-28T06:32:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
नाशिक : भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएससह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
शहरातील वडाळा रोडवरील एक पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष रमजान पहिलवान, जमील सिद्दिकी, अजमल फारुखी, सूचिता चव्हाण, जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, महानगरप्रमुख इम्रान चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आझमी म्हणाले, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून वादग्रस्त विधाने करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहे अशा राजकीय पक्षांची मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावी, यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे. कारण यांच्या पोळ्या भाजण्यासाठी देशात जातीयवाद उफाळून दंगली घडवून आणण्याचा समाजकंटक प्रयत्न हेतुपुरस्सर करीत असल्याचा आरोप आझमी यांनी यावेळी केला.
केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार विकास करु शक्त नाही, म्हणून फक्त जातीयवादाला खतपाणी घालून सत्ता भोगण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्याने त्यांना आयोध्या व राम मंदिराची आठवण झाली आणि शिवसेनेला स्मरण. स्वातंत्र्यपूर्वीपासून देशातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीतपणे राहत आले आहेत, मात्र इंग्रजांनी येथे सत्ता गाजविण्यासाठी जातीय तेढ निर्माण केला, आणि मोदी व त्यांचे सरकार देखील तेच करू पाहत आहे. देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो मुस्लिमांनी बलिदान दिले आहे. आता काही मुठभर लोक देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यात ते यशस्वी होणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्मामध्ये ज्यावेळी सैन्य तयार केले. त्यात ४० टक्के जवान मुस्लिम समाजाचे होते, असा दाखलाही त्यांनी दिला.
शंभर दिवसात परदेशातील काळे धन देशात आणून प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा रोख ठोक सवालदेखील आझमी यांनी मोदी सरकारला केला. लाखो कोटी रुपये घेऊन चोरटे देशातून फरार झाले तेव्हा मोदी यांनी कानावर हात अन् डोळे बंद का केले? नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशातील ५ कोटी जनता बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी केला.
देशाचे वातावरण दूषित करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. मागील साडेचार वर्षात कधी गोहत्या, कधी लव्ह जिहाद, तीन तलाक अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करुन देशातील अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करण्यात आल्याचे ते म्हणाले.
भारतभर गोहत्या बंदी लागू करा
संपूर्ण भारतात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराष्ट्रात गोहत्या बंदी करू नये, तर संपूर्ण भारतात गोहत्यावर बंदी घालावी, असा सल्ला आझमी यांनी मोदी सरकारला दिला.
एकात्मता जोपासा, भारत बलशाली करा
देशाचे तुकडे होऊ देऊ नका, भारताच्या एकात्मतेला छेद देऊ नका, हिंदू मुस्लीम, शीख, इसाई सगळे सौख्याने मानवतेने राहून भारताला बालशाली बनवूया, जातीयवादी शक्ती आणि त्यांच्या विचारांना मूठमाती द्या, यातच सगळ्यांचे कल्याण आहे, असेही आझमी म्हणाले.