नवी मुंबईत ६० हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगार अपेक्षित; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:03 AM2023-02-01T08:03:53+5:302023-02-01T08:04:27+5:30
Maharashtra Government : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या क्षेत्रात ६० हजार कोटींची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगासाठी राखीव असलेल्या ८५ टक्के औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिरिक्त अनुज्ञेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्थांना उद्योग क्षेत्र म्हणून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा उपलब्ध होतील.
नवी मुंबई येथे एकात्मिक औद्योगिक क्षेत्र सन २००६ मध्ये सिडकोच्या संयुक्तिक भागीदारीतून नवी मुंबई आर्थिक विकास क्षेत्राची (NFMSZ) रचना करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. परंतु बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे व केंद्र शासनाच्या बदललेल्या कर रचनेमुळे विशेष आर्थिक क्षेत्र हे कार्यान्वित होऊ शकले नाही. त्याकरिता शासनाने त्यास एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामध्ये रुपांतर करण्यास २०१८ मध्ये मान्यता दिली.
प्रदूषण विरहित उद्याेग आवश्यक
औद्योगिक क्षेत्रामध्ये जे उद्योग स्थापन करण्यात येणार आहेत, ते उद्योग प्रदूषण विरहित असणे आवश्यक आहे.
नवी मुंबईची विशेष भौगोलिक रचना व पर्यावरण लक्षात घेता, सेवा उद्योगांवर भर दिला जाईल.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा येथे उभ्या करण्यास मान्यता दिली आहे. संबंधित उद्योगांना पुरक होणाऱ्या शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था उभ्या करणेही आवश्यक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नामांकित शैक्षणिक संस्था, संशोधनात्मक संस्था या उद्योग क्षेत्र म्हणून अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.