नागपूर - बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या आवाहनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही दुजोरादिला.संमेलनात होणा-या विविध कार्यक्रमांची माहितीही या वेळी देण्यात आली. संमेलनाच्या परिसराला ‘महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री चुडासमा उपस्थित राहणार आहेत.संमेलनात एकाच परिसरातील विविध स्थळांवर चार परिसंवाद, कविसंमेलन, मान्यवरांचे काव्यवाचन, बोलीतील कविता, स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन, प्रतिभावंतांचा सहवास, कथा-कथाकार, कथानुभव, टॉक-शो या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन.मराठी भाषेचे वैभव व गौरवाचे दर्शन घडविणारा ‘मराठी भाषा सुंदरी’ हा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संगीत पहाट, शास्त्रीय गायन आदी कार्यक्रम होणार आहेत. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे सांगीतिक दर्शन, बडोद्याच्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेले बडोदा कलावैभवसोबतच कविकट्टा, प्रकाशन मंच, प्रकाशकांचा मेळावा होणार आहे.साहित्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रियानिमंत्रितांना मानधन व प्रवासभत्ता न देण्याबद्दल साहित्य क्षेत्रातून तीव्र नापसंतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मानधन हा साहित्यिकांचा सन्मान आहे, आयोजक तो कसा नाकारू शकतात. क्षमता नसेल तर हा शिवधनुष्य हातात घेतला कशाला, असा प्रश्नही विचारला जात आहे.
निमंत्रितांना मानधन नाही, इच्छुकांनी स्वखर्चाने यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:52 AM