दवणेंचे साहित्यिकांच्या विवेकबुद्धीला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 01:46 AM2016-10-27T01:46:41+5:302016-10-27T01:46:41+5:30
मराठी साहित्यात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. साहित्यिक दिवाळी वाचकही चांगल्या प्रकारे साजरी करतात. तेच औचित्य साधत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या
डोंबिवली : मराठी साहित्यात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. साहित्यिक दिवाळी वाचकही चांगल्या प्रकारे साजरी करतात. तेच औचित्य साधत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणातील उमेदवार, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी त्यांच्या प्रचाराला सोशल मीडियातून गती दिली आहे. विवेकबुद्धीच्या दीपाला साक्षी ठेवत साहित्यिकांनी मला मतदान करावे, असे भावनिक आवाहन प्रवीण दवणे यांनी केले आहे.
दवणे यांनी मतदारांना आवाहन करणाऱ्या पत्रकात आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. माझी साहित्य यात्रा वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरु झाली. त्याला चार दशके पूर्ण झाली आहेत. मराठीतील समृद्ध साहित्याने माझ्या जीवनाला परिमाण दिले. जगण्याचे उद्दीष्ट दिले. संत, पंत आणि तंत व विचारवंत वाङमयाने अभिव्यक्त होण्याची उर्मीही मला दिली. कविता मूळ असले, तरी ललितगद्य, गीते, कांदबरी, नाटक व बालवाङमयात भरपूर मुशाफिरी केली.
३५ वर्षांचे मराठीचे अध्यापन, व्याख्याने, नवी पिढी-पालक-शिक्षक हा चिंतनाचा केंद्रबिंदू, युवा पिढीतील संघर्षाने अंतर्मुख केल्याची भावना दवणे यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे युवा व पालकपिढी यांना साहित्य मूल्यविचार देण्याची संधी आहे. हे पद केवळ जीवनअखेरीचा सन्मान न ठरता तो पुढील वाटचालीसाठी साहित्य रसिकांनी दिलेला गंभीर जबाबदारीचा संकेत असेल, यावर दवणे यांनी भर दिला आहे. (प्रतिनिधी)