घराणेशाहीसाठी वाट्टेल ते!

By Admin | Published: April 2, 2015 02:56 AM2015-04-02T02:56:10+5:302015-04-02T02:56:10+5:30

येथील महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा वारसा चालविण्यासाठी स्थानिक नेते वाट्टेल तो आटापिटा करत असून कुटुंबातील सदस्याला उमेदवारी

It is for the sake of family! | घराणेशाहीसाठी वाट्टेल ते!

घराणेशाहीसाठी वाट्टेल ते!

googlenewsNext

औरंगाबाद : येथील महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा वारसा चालविण्यासाठी स्थानिक नेते वाट्टेल तो आटापिटा करत असून कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्यासाठी व तो नगरसेवक होण्यासाठी डावपेचांची आखणी करताना दिसत आहेत.
जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवार निवडीसाठी मुलाखती झाल्या असून, तिकीट वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. स्वत:ला किंवा पत्नी, मुलगा, मुलगी, भाची, पुतण्या आदींना उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. माजी आ. प्रदीप जैस्वाल आणि आ. संजय शिरसाट यांनाही आपले पुत्र अनुक्रमे ऋषिकेश आणि सिद्धांत नगरसेवक व्हावेत व त्यांनी आपला राजकीय वारसा पुढे चालवावा, असे वाटते.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नंदकुमार घोडेले हे स्वत: आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिताताई घोडेले हे दोघेही आपल्याच घरात दोन नगरसेवकपदे राहावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी मंत्री गंगाधर गाडे हेदेखील आपल्या घरातील किमान एकाने नगरसेवक व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांची सध्या शिवसेनेबरोबर बोलणी चालू असून, त्यांनी काही जागांची मागणी केली आहे. त्यांची पत्नी, सून किंवा बहीण निवडणूक लढवू शकतात.
विद्यमान नगरसेवक अफसर खान हे स्वत: कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेतच. शिवाय ते पत्नी किंवा भाऊ यांच्यासाठीही प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक ख्वाजा शरफोद्दीन हेदेखील त्यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने शेजारच्या वॉर्डात घुसले आहेत. मूळ वॉर्डातून त्यांच्या पत्नी किंवा भाची निवडणूक लढवेल. शिवाय त्यांचा पुतण्याही अन्य एका वॉर्डातून इच्छुक आहे. भाजपाचे नगरसेवक प्रशांत देसरडा हे स्वत: आणि त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहेत. देसरडा यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी निवडणूक लढवतील. भाजपाचे शहराध्यक्ष बापू घडामोडे यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आता पुन्हा वॉर्ड खुला झाल्याने नगरसेवकपद आपल्याच घरात राहावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: It is for the sake of family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.