बेळगाव - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. सध्या सीमावादाचा मुद्दा न्यायालयात आहे मात्र बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. याच सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी केले आहे. बेळगावात जात धीरज देशमुखांनी जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा केल्याने सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे.
बेळगावात राजहंस गड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना धीरज देशमुखांनी भाषण केले. मात्र भाषणाचा समारोप करताना जय शिवराय, जय महाराष्ट्र असं म्हटलं. त्यानंतर ते खुर्चीकडे जात होते परंतु पुन्हा माघारी येत त्यांनी माईकवरून जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा दिली.
आमदार धीरज देशमुखांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीमावासियांच्या चळवळीबद्दल विलासराव देशमुखांचे योगदान मराठी भाषिक कधीही विसरणार नाही. पण यावर पाणी फिरवण्याचं काम धीरज देशमुखांनी केले आहे. सीमावासियांच्या भावना दुखावण्याचं काम केले. राष्ट्रीय पक्षाच्या अजेंड्यापुढे महाराष्ट्राची अस्मितेला कमीपणा दिला आहे. यापुढे महाराष्ट्रातील नेत्यांची विचार करावा. ही चळवळ मोठी आहे की पक्षाचा अजेंडा मोठा आहे याची जाण ठेऊन बेळगावात यावे अशी टीका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या कन्नड गाण्यावरूनही झाला होता वाद२०१८ मध्ये भाजपाचे तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील हे बेळगावात गेले असताना त्याठिकाणी एका कार्यक्रमात त्यांनी कन्नड गाणे गायले होते. हट्टी दरे कन्नड, नलली हट्ट बेकू या अभिनेता राजकुमारच्या गाण्याचे बोल पाटलांनी आळवले. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे असा होत असल्याने त्यांच्याविरोधात सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरली होती. या विधानावरून वाद निर्माण झाला होता.