ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २७ - पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय' वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून आता त्याच्या तपासासाठी सीआयडीला पाचारण करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
आशियातील सर्वात मोठा वाघ अशा 'जय'ची ओळख असून तो गेल्या काही वर्षांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या. एवढेच नव्हे, तर मुंबई-पुण्यावरून व्हीव्हीआयपीसुद्धा त्याला पाहण्यासाठी येथे येत होते. अशा प्रकारे ‘जय’ हा मागील तीन वर्षांत वाघांमधील ‘हिरो’ झाला होता.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे. तो अचानक गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच 'जय'च्या हत्येच्या संशयावरून वनविभागाच्या अधिका-यांनीभंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेतले होते.