मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविका करणार जेलभरो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:34 PM2018-12-11T15:34:54+5:302018-12-11T15:35:13+5:30
केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ जाहीर केली, मात्र राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात धरणे दिले.
मुंबई : केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ जाहीर केली, मात्र राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात धरणे दिले. पुढील महिन्यापर्यंत मानधन वाढ फरकासहीत न मिळाल्यास जानेवारीत संप, तर फेब्रुवारीत जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी सप्टेंबरमध्ये सीधी बात कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीची घोषणा केली होती. एक ऑक्टोबरपासून ही वाढ अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना मिळायला हवी होती. मात्र, घोषणेच्या दोन महिन्यानंतरही अंगणवाडी कर्मचारी अद्याप मानधनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणूनच केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात उतरण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील २ लाख ७ हजार अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी बंद ठेवतील. त्यानंतरही सरकारने वाढीव मानधनाची अंमलबजावणी केली नाही तर ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी कर्मचारी जेलभरो आंदोलन करतील.
याआधी पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० आणि मदतनीसांच्या मानधनात ७५० रुपयांची वाढ घोषित केली होती. त्याप्रमाणे आंध्र प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या काही राज्यांनी मानधनवाढीचे शासन निर्णय जाहीर केले आहेत. मात्र, भाजपप्रणीत सरकार असलेल्या महाराष्ट्रात अद्याप शासन निर्णय जारी झालेला नाही. या दप्तर दिरंगाईचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात जमल्याचे कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले. यापुढेही राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून मानधन वाढ देण्यास विलंब केल्यास अंगणवाडी कर्मचारी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही उटाणे यांनी दिला आहे.