मुंबई - मराठवाड्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा होताना दिसत आहे. औरंगाबाद, बीड पाठोपाठ आता जालना जिल्ह्यातही महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आपल्या ताब्यात कायम ठेवली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.
राज्यात भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापन केली. यामुळे विधानसभा निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या या प्रयोगाला सुरुवात आधीच झाली होती. जालना जिल्हा परिषदेत हा प्रयोग आधीच अस्तित्वाल आला आणि यशस्वीही ठरला.
जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली आहे. यामध्ये शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते. तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले होते. आता पुन्हा एकदा जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीने बिनविरोध राखली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेचे उत्तम वानखेडे आणि महेंद्र पवार यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.