मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'एग्रीकल्चर स्ट्राइक' करत राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे. तर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची किंवा रांगेत उभे रहाण्याची गरज नसणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी या घोषणेनंतर स्पष्ट केलं आहे.
तर या कर्जमाफीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात येत आहे. मात्र या कर्जमाफीचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही फॉर्म भरायची किंवा रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
तसेच या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले असल्याचे सुद्धा जयंत पाटील म्हणाले.