Jitendra Awhad, Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांच्या साथीने 'हर हर महादेव' चित्रपटाचा ठाण्यातील शो बंद पाडला होता. त्या प्रकरणी आज त्यांना अटक करून वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे दिसून आले. "मराठ्यांच्या इतिहासात महिलांना कायमच सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. शिरवळ येथे महिलांचा बाजार भरत असल्याची इतिहासात कुठेही नोंद नाही, मात्र चित्रपटात मुद्दाम संपूर्ण मराठा इतिहासाला बदनाम करण्याच्या हेतूने महिलांचा बाजार भरत असल्याचे दाखवले जात आहे. या चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांना इतिहासाचे विकृतीकरण मान्य आहे का?" असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
"अफझल खान वधाच्या घटनेला पौराणिक नाट्यमयता देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एका पौराणिक काल्पनिक पात्राचे स्मरण व्हावे, हा यामागे उद्देश आहे. यातून शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करून महाराजांना ‘दैवी’ भासवून माणूस म्हणून त्यांचे शक्ती, बुद्धी व कर्तृत्व कमी लेखण्याचा प्रयत्न दिसतो. बाजीप्रभू देशपांडे शिवरायांच्या बाबतीत काही नकारात्मक भूमिका घेत असल्याचे देखील या चित्रपटात दाखवले गेले आहे. अशा खोट्या प्रसंगांचा नेमका उद्देश काय?" असेही जयंत पाटील म्हणाले.
"बांदल व जेधे घराण्यांचे इतिहासात मोठे योगदान असताना अत्यंत कपोलकल्पित रीतीने बांदल व जेधे घराण्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. मूळ मुद्दा असा उरतो की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण केवळ शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का होते? इतिहासात रंजक अशा अनेक गोष्टी असताना केवळ शिवाजी महाराजांचा इतिहास रंजक व काल्पनिक करण्यामागे काय कारण असावे? आम्ही भारतीय संविधानाचा कायमच आदर करतो, यापुढेही आदर व पालन कायम करत राहू, मात्र या संविधानाच्या चौकटीचा आधार घेत काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करत असतील तर ते आम्हाला कदापि मान्य होणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.