मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. त्यामुळे विरोधकांनी राष्ट्रपतींच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तर याच निर्णयावरून राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोगोईंवर निशाणा साधला आहे.
गोगोई यांच्या राज्यसभेवर होणाऱ्या निवडीवरून आव्हाड यांनी ट्वीट करत जहरी टीका केली आहे. राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या, असा टोला त्यांनी लगावला.
तर बाबासाहेब बघता आहात ना...वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेश बंदी ही काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभेतल्या १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपती करतात. त्यामुळे आपल्या या अधिकाराचे वापर करत राष्ट्रपतींनी गोगोई यांची निवड केली आहे. रंजन गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. त्याआधी त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीच्या खटल्यात निकाल सुनावला. तर अयोध्येसोबतच आसाम एनआरसी, राफेल, सरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्यासारखे महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी दिले होते.