"फाशी दिली तरी चालेल...मी जे केलेलं नाही, तो गुन्हा कबूल करणार नाही"; आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 03:56 PM2022-11-11T15:56:24+5:302022-11-11T17:41:17+5:30
Jitendra Awhad: चित्रपटगृहात राडा केल्याप्रकरणी ठाण्यातील वर्तक पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेतले आहे.
Jitendra Awhad: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 'हर हर महादेव' चित्रपटावरून चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चित्रपटगृहात एका व्यक्तीला बेदम मारहाण झाली होती. त्याप्रकरणी आव्हाडांना अटक झाली आहे. दरम्यान, या अटकेवर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो सुरू होता. तेव्हा जितेंद्र आव्हाड तांच्या कार्यकर्त्यांसोबत तिथे पोहोचले आणि शो बंद पाडला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला त्याच्या बायकोसमोर बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या अटकेबाबत आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.
Maharashtra | NCP MLA Jitendra Awhad arrested by Vartak Nagar Police in Thane in connection with a protest against the screening of Marathi film 'Har Har Mahadev' in a local theatre a few days back: Thane Police
— ANI (@ANI) November 11, 2022
(File photo) pic.twitter.com/2budBinZma
'फाशी दिली तरी...'
यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो गुन्हा कबूल करणार नाही." दुसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, ''आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो."
"पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल."
नेमकं काय प्रकरण?
'हर हर महादेव' या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल केल्याने, संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.