पनवेल : पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर शुक्र वारी खारघर येथील चतुर्भुज इमारतीजवळ हल्ला झाला. हल्ल्यात सूर्यवंशी त्यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत असून, घटनेच्या निषेधार्थ खारघर येथील उत्सव चौकात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी या वेळी करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या या निदर्शनावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, किरण नाईक आदींसह मोठ्या संख्येने पनवेल, नवी मुंबई, मुंबईमधील पत्रकार उपस्थित होते. खारघर येथील उत्सव चौकात पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली, तसेच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यानंतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले.
सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी खारघरमध्ये पत्रकारांची निदर्शने
By admin | Published: April 04, 2017 3:44 AM