मंत्री नव्हे मुख्यमंत्रीचं होणार; टोपेंच्या नागरिक सत्कारप्रसंगी गोरंट्याल यांची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:50 AM2020-01-14T11:50:34+5:302020-01-14T12:08:01+5:30
आपल्या खास शैलीत शेरोशायरी करीत गोरंट्याल यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
मुंबई : घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांची मंत्रीपदी व जालन्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने सोमवारी सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र टोपे यांचा सत्कार सोहळा काँग्रेसचे नेते व जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या शेरोशायरी आणि फटकेबाजीने गाजला.
यावेळी बोलताना आपल्या खास शैलीत शेरोशायरी करीत गोरंट्याल यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आज तीन पक्षाचे सरकार असताना राजेश टोपे यांना मंत्री होण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. मात्र आपली संधी हुकल्याचे दुःख व्यक्त करताना आपण मंत्री नाही तर थेट मुख्यमंत्री होऊ, असा टोला गोरंट्याल यांनी लगावल्यावर सभागृहात हशा पिकला.
तर यावेळी त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सुद्धा स्तुती केली. गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त निधी हा रावसाहेब दानवे यांनी आणल्याचे आवर्जून सांगून त्यांची स्तुती करताना ते विकासपुरुष असल्याचे गोरंट्याल यांनी नमूद केले.
तर जालना जिल्ह्यात परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील जागा वाढविण्याची मागणी करून जेनेरिक हब, मनोरुग्णालय जालन्यात व्हावे म्हणून घोषणा केली होती. त्यासाठी टोपे यांनी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे सुद्धा यावेळी गोरंट्याल म्हणाले.