केरळ लोकसेवा आयोग हे 'एमपीएससी'च्या तुलनेत मनुष्यबळाच्या दृष्टीने खूपच सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:31 AM2020-10-03T06:31:07+5:302020-10-03T06:35:01+5:30
एमपीएससीकडे अपुरे मनुष्यबळ; परीक्षेवर परिणाम
पुणे: केरळ राज्य महाराष्ट्रपेक्षा कैक पटीने लहान असूनही केरळ लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तुलनेत मनुष्यबळाच्या दृष्टीने खूप सक्षम आहे. केरळ आयोगाकडे विविध स्पर्धां परीक्षा घेण्यासाठी 1 हजार 641 तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केवळ 271 एवढे मनुष्यबळ आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससीला अधिक सक्षम करावे,अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी;यासाठी सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हावी,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वारंवार केली. मात्र, राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष करत महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अनेक पदांची भरती प्रक्रिया राबवली.परंतु, त्यास तीव्र विरोध झाल्याने अखेर महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले. आता काही पदांची भरती विभागीय स्तरावर केले जाणार आहे.तरीही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी समाधनी नाहीत.
एमपीएससीकडून गट अ व ब दर्जाच्या राजपत्रित पदांची भरती, मुंबई महापालिकेतील लिपिकांची भरती, वस्तू व सेवा कर विभागातील कर सहाय्यकांची पदांची असेच बेस्ट मधील वरिष्ठ पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तर केरळ लोकसेवा आयोगाकडून केरळ राज्य सरकार, वीज मंडळ, परिवहन मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था ,15 शिखर सहकारी संस्था व सहकारी बँका आणि इतर महामंडळात मधील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते.
----------------------
केरळ लोकसेवा आयोगाकडे मनुष्यबळ
अध्यक्ष -१
सचिव - १
अप्पर सचिव -४
सहसचिव -१३
उपसचिव -२४
अवर सचिव -६९
कक्ष अधिकारी -२०८
स्वीय सहाय्यक सहाय्यक व इतर लिपिक वर्गीय कर्मचारी - ८००
-----------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मनुष्यबळ
अध्यक्ष - १
सचिव -१
सह सचिव -२
उप सचिव - ७
अवर सचिव -१५
कक्ष अधिकारी -२५
सहाय्यक कक्ष अधिकारी -९६
लिपिक -टंकलेखक -६४
चतुर्थ श्रेणी कर्मचारी -२५
....
स्पर्धा परीक्षा व विभागीय परीक्षाच्या माध्यमातून भरती करणे, अधिकाऱ्यांची पदोन्नती करणे, एखाद्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा करणे आदी कामे एमपीएससीला करावी लागतात. - सुधीर ठाकरे ,माजी अध्यक्ष, एमपीएससी.