संदीप बावचे - जयसिंगपूर - पाच हजार लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील सामाजिक एकोपा असणारे घालवाड. पहिल्यापासूनच गावाचा पैलवानांचे गाव म्हणून नावलौकिक. हेच पैलवान आता खाकी व लष्करी सेवेच्या सर्व परीक्षांसाठीही शड्डू ठोकत आहेत व त्या कसोट्यांवर यशस्वी होत आहेत. घालवाड येथील करिअर संस्थेमार्फत या मुलांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते. लष्कर, पोलीस दल, केंद्रीय-राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे पोलीस, सीमा सुरक्षा दल, सैन्य दल, तोफखाना यासह विविध विभागांत ६० हून अधिक तरुण आपली सेवा बजावित आहेत. यात विशेषकरून १२ मुली पोलीस सेवेत असून, यातील एक विद्यार्थिनी फौजदार बनली आहे. क्रीडाक्षेत्रात नेमबाज म्हणून नावलौकिक मिळविलेली राही सरनोबत, तर बुद्धीच्या क्षेत्रात भारतीय लोकसेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) मध्ये सेवा बजावणारा निशांत जाधव सुद्धा याच गावचे. गावात विधायक काय करता येईल का? या विचारातूनच सर्व जाती-धर्माच्या तरुणांनी खाकीपासून लष्करापर्यंत शासकीय सेवेत जाण्यासाठी जणू चंगच बांधला आहे. कुस्तीच्या आखाड्याबरोबर वैचारिक प्रबोधन व विधायक संस्काराची गरज ओळखून नुकतेच दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनही येथे मोठ्या उत्साहात पार पडले. ‘शेती, शेतकरी, राजकारण आणि साहित्य’ या परिसंवादातून शेतकरी आणि साहित्यिक याचा वैचारिक मिलाफ या निमित्ताने घडला. गेल्या चार वर्षांपासून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे येथे आयोजन केले जात आहे. सामाजिक एकोपा ठेवून याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व मौला अली तुरबत (गादी)चे एकत्र पूजन केले जाते. शाहू महाराज व बडोद्याच्या सरकारांनी येथील कुस्तीची दखल घेतली होती. मुलगा जन्माला आल्यानंतर सव्वा महिन्याने येथील तालीम मंडळातील लाल मातीवर ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे. करबलही उत्साहाने खेळला जातो. गावामध्ये पाच भजनी मंडळे आहेत. पैलवानांचे गाव अशीच ओळख असणाऱ्या या गावांमध्ये पूर्वी जातीय समीकरणामुळे जेवणाच्या दोन पंगती असायच्या. आता कोणत्याही कार्यक्रमात एकच पंगत बसते. गेल्या पंधरा वर्षांपासून पारायण सोहळ्याची अखंडित परंपरा सुरू आहे. या सर्व प्रवाहात प्रबोधनाची चळवळ रूजावी, विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान मिळून एक चांगल्या विचारातून बदल घडावा, यासाठी दरवर्षी व्याख्याने ठेवली जातात. सामाजिक बांधीलकीसाठी गावातील सेवा संस्थेकडून विद्यार्थ्यांना बक्षिसातून प्रोत्साहित केले जाते. छोट्या गावात असणारी ही संस्था दरवर्षी दहा कोटींची उलाढाल करते.घालवाड या गावाला शंभर वर्षांपूर्वीची पैलवानकीची परंपरा आहे. ‘कोल्हापूर केसरी’पासून ‘महाराष्ट्र केसरी’पर्यंत येथील मल्लांनी आपली बाजी मारली आहे. शिरोळ तालुक्यात पहिली वीज सेवा मिळालेले गाव म्हणून आजही या गावाचा उल्लेख होतो. माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही या गावास भेट दिली होती. जिल्ह्यातील पहिले ग्रामसचिवालय येथे बांधण्यात आले.
खाकी, लष्करी सेवेत पैलवान ठोकताहेत शड्डू!
By admin | Published: January 15, 2015 12:05 AM