Kirit Somaiya: किरीट सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, खोटी FIR दाखल केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 08:29 AM2022-04-27T08:29:00+5:302022-04-27T08:29:34+5:30
Kirit Somaiya : पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा सोमय्यांकडून करण्यात येतोय. त्याबाबत तक्रार करण्यासाठी ते मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.
मुंबई: पोलिसांनी खोटी FIR दाखल केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या लावला आहे. पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावाही सोमय्यांकडून करण्यात येतोय. आता या संदर्भात सोमय्या आणि भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची भेट घेणार आहेत.
बनावट एफआयआरबाबत तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. यावेळी ते सुमारे दीड तास खार पोलीस स्थानकात होते. त्यानंतर त्यांनी बाहेर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच मुंबई पोलीस आयुक्तांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप सोमय्यांनी यावेळी केला. तसेच, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असून, या संदर्भात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्याच्या प्रकरणात किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यातला वाद अधिकच चिघळला आहे. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझी तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांवर खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला.