मुंबई - भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा नवीन अवतार समोर आला आहे. सीएए कायद्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एका शाळेत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र शालेय विद्यार्थ्यांना राजकारणात का ओढायचे, असा सवाल करत राज्यसरकारने संबंधीत शाळेला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी काहीही उत्तर न देता एकच शब्द 27 वेळा उच्चारला.
सोमय्या यांना प्रश्न विचारल्यानंतर ते एकच उत्तर देत होते, ते म्हणजे 'मैने आपको जवाब दे दिया है'. वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने अनेकदा सोमय्या यांना शाळेत सीसीए संदर्भात घेतलेल्या कार्यक्रमावरून प्रश्न विचारले. त्यावर सोमय्या वारंवार एकच सांगत होते, मी उत्तर दिले आहे.
मुंबईतील माटुंगा येथील दयानंद बालकी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाजपच्या कार्यक्रमात सामील करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. तसेच त्यांना देशद्रोही कोण याविषयी सांगण्यात आले. यावरून मोठा वाद झाला असून शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.
दरम्यान सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. सीसीए संदर्भात कार्यक्रम घेतलेल्या शाळेला राज्य सरकारकडून नोटीस बजावल्याबद्दल सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.