‘किरवंत’ वीस वर्षांपासून मराठी रंगभूमीपासून दूरच!
By Admin | Published: March 6, 2017 05:24 AM2017-03-06T05:24:27+5:302017-03-06T05:24:27+5:30
मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘किरवंत’ या ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या नाट्यकृतीला मराठी रंगभूमीच दुरावली
पुणे : मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘किरवंत’ या ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या नाट्यकृतीला मराठी रंगभूमीच दुरावली आहे. स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणांच्या व्यथा-वेदनेला वाचा फोडणारे हे नाटक आज ३५ वर्षांनंतरही तेलगु, कन्नड, हिंदी, बंगाली आदी रंगभूमींना खूणावते आहे. मात्र गेल्या वीस वर्षांत ते मराठी रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न एकाही निर्मात्याने केलेला नाही.
आजही ब्राह्मण समाजात अंत्यविधी करणाऱ्या किरवंतांची संख्या कमी आहे. ३५ वर्षांचा काळ उलटला, तरीही किरवंताच्या व्यथा संपलेल्या नाहीत. वीस वर्षांपूर्वी रुपवेध संस्थेतर्फे डॉ. श्रीराम लागू यांनी ‘सुयोग’ नाट्यसंस्थेच्या सहकार्याने हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे पंचवीस प्रयोग झाले आणि काही वादामुळे ते बंद पडले. त्यानंतर ही नाट्यकृती मराठी रंगमंचावर पुन्हा आलीच नाही. कन्नड, तेलगु, हिंदी , इंग्रजी भाषांमध्ये हे नाटक अनुवादित झाले असून, आता बंगालीमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. एम. ए. मराठी आणि इंग्रजी अभ्यासक्रमांमध्ये या नाटकाचा समावेश आहे. आता याचे प्रयोग रंगभूमीवर पुन्हा व्हावेत, अशी इच्छा प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.(प्रतिनिधी)