कोल्हापूर मतदारसंघ : खा. महाडिक सांगा कुणाचे..? स्वपक्षीयांचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:40 AM2019-02-05T06:40:03+5:302019-02-05T06:40:47+5:30

कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजपा-शिवसेनेपेक्षा दोन्ही काँग्रेसमधूनच टोकाचा विरोध होत आहे. त्यांनी संसदीय कामकाजात उत्तम छाप पाडली आहे.

 Kolhapur constituency: Kha. Mahadik tell someone ..? The opposition to the opposition | कोल्हापूर मतदारसंघ : खा. महाडिक सांगा कुणाचे..? स्वपक्षीयांचाच विरोध

कोल्हापूर मतदारसंघ : खा. महाडिक सांगा कुणाचे..? स्वपक्षीयांचाच विरोध

Next

- विश्वास पाटील

कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजपा-शिवसेनेपेक्षा दोन्ही काँग्रेसमधूनच टोकाचा विरोध होत आहे. त्यांनी संसदीय कामकाजात उत्तम छाप पाडली आहे. खासदार म्हणून विमानसेवा, ईएसआय रुग्णालय, रेल्वे सेवा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. शरद पवार यांच्याशी उत्तम संबंध आहेत. ‘महाडिक गट’ म्हणूनही त्यांची ताकद आहे; परंतु हे सगळे असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच त्यांच्यामागे नाही, असे आजचे चित्र आहे.
कागलला परिवर्तन यात्रेत गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच महाडिकांविरोधात जोरदार शेरेबाजी झाली व तिला वैतागून त्यांना आपले भाषण थांबवावे लागले. निवडणुका आल्या असताना ही गटबाजी चांगले लक्षण नाही. महाडिक निवडून आले राष्ट्रवादीच्या चिन्हावर. त्यावेळी त्यांना काँग्रेससह जनसुराज्य पक्ष यांची मोठी मदत झाली; परंतु त्यांनी मात्र एकदा
गुलाल अंगावर पडल्यावर या पक्षांविरोधात काम केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ यांच्यापासून ते अन्य नेतेही उघडपणे त्यांच्या विरोधात आहेत. आता पवार यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे लागेल, अशी तंबी दिली असली तरी गावपातळीवरील कार्यकर्ता त्यांच्याशी किती प्रामाणिक राहतो, यावरच त्यांचे भवितव्य ठरेल.
महाडिक हे सर्वपक्षीय राजकारण करणारे कुटुंब आहे. त्यांना कोणत्याच पक्षाचे वावगे नसते. त्यांच्या घरात खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच ‘गोकुळ’ची सत्ता आहे. त्यामुळे ‘सगळे आम्हालाच’ या त्यांच्या प्रवृत्तीबद्दलही जनमानसात नाराजी आहे. या मतदारसंघातील सहापैकी तीन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचा एक आमदार आहे. राष्ट्रवादीकडे दोन आमदार आहेत. महाडिकांविरोधात गेल्या लढतीप्रमाणेच शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक हे रिंगणात उतरणार आहेत. गेल्या वेळेस भाजपाची हवा व मोदी लाट असल्याने त्यांना पावणेसहा लाख मते मिळाली. मंडलिक हे राष्ट्रवादीचेच दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव आहेत. ते शिवसेनेत असले तरी स्थानिक राजकारण़ात त्यांचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही त्यांना विरोध दर्शविला आहे.
गेल्या वेळेस एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. या वेळेलाही कितीही उमेदवार रिंगणात राहिले तरीही लढत दुरंगीच होणार आणि तिचा निकालही २५ हजार मताधिक्याच्या आत लागणार, इतकी चुरस होण्याची चिन्हे आहेत.

सध्याची परिस्थिती

खासदार महाडिक यांची संसदेतील कारकीर्द उत्तम; परंतु निवडून आल्यानंतर पक्षविरोधी काम केल्याने पक्षातूनच सर्वाधिक विरोधाचा सामना करावा लागत आहे.

दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आपण खा. धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघड काम करणार असल्याचे जाहीर केल्याने अडचणीत वाढ.

मतदारसंघातील संपर्क, स्थानिक प्रश्न सोडविण्यात फारशी मदत झाली नसल्याची लोकांतून भावना.

राष्ट्रवादीचे खासदार असूनही धनंजय महाडिक हे भाजपा नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेमात जास्त असल्याची पक्षातूनच उघड तक्रार

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, तरीही पक्षातंर्गत विरोधक व आघाडीतील कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा विरोध कसा हाताळणार यावरच निवडणूक भवितव्य ठरणार

भाजपा-शिवेसना युती झाल्यास : भाजप-शिवसेनेची युती झाल्यास कोल्हापूरची जागा शिवसेनेच्या वाट्यालाच जाईल, कारण आजपर्यंत ही जागा शिवसेनेनेच लढविली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेतर्फेच ही जागा लढविली होती.

6,07,665
धनंजय महाडिक
(राष्ट्रवादी काँग्रेस)

5,74,406
संजय मंडलिक
(शिवसेना)

13,162
संपतराव पवार
(शेकाप)

9,291
अजय कुरणे
(बसपा)

7,067
अतुल दिघे
(भारिप-बहुजन महासंघ)

Web Title:  Kolhapur constituency: Kha. Mahadik tell someone ..? The opposition to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.