किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदी उठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:43 PM2021-09-27T21:43:03+5:302021-09-27T21:43:39+5:30
Kirit Somaiya : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे.
कोल्हापूर : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरील निर्बंध कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले आहेत. यामुळे आता किरीट सोमय्यांच्या दौऱ्यातला अडथळा दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, कोल्हापूरमधील कारखान्याची पाहणी करुन पोलिसांत मुश्रीफांविरोधात तक्रार सोमय्या तक्रार करणार आहेत.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन जारी करत याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, २८ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांचा नियोजित कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा पारित केलेला आदेश विखंडित करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार होते. मात्र, त्यावेळी मुश्रीफ समर्थक संतप्त झाले होते. त्यामुळे किरीट सोमय्यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जिल्हाबंदी लागू केली होती. परंतु अखेर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी आता हटवली आहे.
Kolhapur Collector just inform Me that Restrictions on My Kolhapur Entry Withdrawn pic.twitter.com/WMaywNZpwU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 27, 2021
जिल्हाबंदी हटवल्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारनं ठाकरे सरकार आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलिसांना नोटीस पाठवली की जर किरीट सोमय्यांची गनिमी काव्यानं हत्या करण्यात येणार होती तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही? आणि ते कोण करणार होतं ते शोधून काढावं. मी जिल्हाधिकारी, एसपी आणि ठाकरे सरकारला सोडणार नाही. गेल्यावेळी खोट बोलून त्यांनी तो प्रतिबंधात्मक आदेश काढला होता. त्यांना उत्तर द्यावंच लागणार. ठाकरे सरकारमध्ये दम नाही किरीट सोमय्यांना थांबवण्याचा. मोदींच्या आदेशाप्रमाणे आम्ही घोटाळामुक्त महाराष्ट्र करु, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाबंदी उठवल्यावर दिला आहे.