डबे सोडून पुढे धावले इंजिन, कोकण रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:11 PM2019-01-28T18:11:01+5:302019-01-28T18:15:30+5:30
कोकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल सीएसएमटी करमाळी एक्सप्रेस गाडीचा अपघात टळला. करमाळीवरून येतांना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे सोडले.
सिंधुदुर्ग - कोकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल सीएसएमटी करमाळी एक्सप्रेस गाडीचा अपघात टळला. करमाळीवरून येतांना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे सोडले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र थोड्यावेळात इंजिन चालकाला घटनेची जाणीव झाल्यानंतर इंजिन डब्यांना पुन्हा जोडण्यात आले. त्यामुळे कोंकण मार्गांवर रेल्वेचा मोठा अपघात टळला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करमालीसाठी विशेष हॉलिडे ट्रेन सुटते, तीच ट्रेन रविवारी (ता.२७) रोजी करमाली वरून सिएसएमटी परत येत होती.कणकवली ते सिंधुदुर्ग दरम्यान रविवारी अचानक धावत्या एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे सोडून इंजिन पुढे गेले.मात्र प्रवासी डबे सुरक्षित रुळावर उभे राहिल्याने मोठा अपघात टळला,हजारो प्रवासी यावेळी एक्सप्रेस मध्ये होते.या घटनेची चालकाला जाणीव होताच त्यांनी इंजिन थांबवून त्याला डब्याशी जोडले. त्यांनतर गाडीला सिएसएमटी स्थानकावर सुरक्षित पोहचविण्यात आले.दरम्यान त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तर भीतीचे वातावरण सुद्धा होते.
कोकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे.तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकऱ्यांंनी सांगितले.