जयंत धुळपअलिबाग : राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित बारापैकी आठ स्थानिक स्वराज्य संस्थांनी हागणदारीमुक्तीची घोषणा करणारे ठराव केले आहेत. त्यांची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी सुरु असल्याची माहिती राज्याच्या नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्ररीत्या कार्यरत स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाच्या सूत्रांनी दिली आहे.कोकण विभागातील एकूण ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये २० हजार ३८३ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १५ हजार ६ शौचालयाची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३ हजार २३९ शौचालयांचे बांधकामे प्रगतिपथावर आहेत. कोकण विभागाने शौचालये बांधकामाचे ७३.६२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून जूनअखेर १०० टक्के शौचालये पूर्ण होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा ९५.२८ टक्के उद्दिष्टपूर्तीसह आघाडीवर असून ठाणे ९४.२२ टक्के, पालघर ७७.४२ टक्के, सिंधुदुर्ग ७१.७२ टक्के व रायगड जिल्ह्याने ६०.२८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संपूर्ण विभागात सिंधुदुर्ग व ठाणे हे जिल्हे पूर्णपणे हागणदारीमुक्त झाले आहेत.राज्यामध्ये एकूण ११ जिल्हे आता पर्यंत हागणदारीमुक्त झाले आहेत. त्यापैकी कोकण विभागातील ५ जिल्ह्यांपैकी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. राज्यातील गुणानुक्र मांकानुसार पहिल्या १५ जिल्ह्यामध्ये कोकण विभागातील सर्व ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण विभागातील एकूण ४५ तालुक्यांपैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. कोकण विभागातील एकूण २ हजार ९६८ ग्रामपंचायतींपैकी २ हजार ७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. २३१ ग्रामपंचायती शिल्लक आहेत. २०१२ च्या बेसलाइन सर्वेनुसार एकूण १३ लाख ३१ हजार ५६१ कुटुंब संख्या आहे. ३१ मे २०१७ अखेर वैयक्तिक शौचालय असलेली एकूण १२ लाख ६० हजार ९६२ कुटुंब संख्या आहे.देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता शहरांना स्वच्छतेची आणि शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देशात हे अभियान राबविण्यात येणार आहे.अंमलबजावणीसाठी स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाची निर्मितीमहाराष्ट्रात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्र म राज्यात सुरु आहेत. यामुळे शहरे स्वच्छ होत आहेत. शौचालयांची निर्मिती होत आहे. शासकीय पातळीबरोबरच सामाजिक संस्था, लोकसहभाग स्वच्छ महाराष्ट्रासाठी प्रयत्न करत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र हे आता अभियान राहिले नसून तिला चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल, समितीकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:28 AM