मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भीमसैनिकांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मालाड लिंक रोडवरील मीठ चौकी येथे भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.मालाड येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री जात होते. या वेळी भिडे, एकबोटे यांना तत्काळ अटक करावी, कोरेगाव भीमा हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांनी आंदोलनही केले.दुसरीकडे मुंबई काँग्रेसनेही निषेध आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्याबद्दल केलेल्या विधानाविरोधात काँग्रेस महिला आघाडीतर्फे मालवणी मालाड येथे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असताना निषेध आंदोलन करण्यात आले. या संभाव्य आंदोलनापूर्वी खबरदारी म्हणून पोलिसांनी मुंबई काँग्रेसच्या मालाड, मालवणी, कांदिवली आणि चारकोप येथील प्रमुख महिला कार्यकर्त्यांना पहाटेच अटक केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या अटकसत्राचा निषेध केला.मोदींची आरोग्यनीती पुढे नेण्यास कटिबद्ध- मुख्यमंत्रीपं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर मुंबई भाजपा कार्यकर्त्यांनी भव्य शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामीण भागात जशी भव्य आरोग्य शिबिरे होतात, तसे शिबिर मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केले आहे. गरजूंना योग्य आरोग्य सुविधा मिळतील, याची काळजी शिबिरात घेतली जात आहे. तृतीय पंथीयांना प्रथमच या आरोग्य शिबिरात समाविष्ट करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी आखलेली आरोग्यनीती पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कोरेगाव-भीमा : भिडे-एकबोटेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 2:29 AM