पुणे : पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कोयनेतील १ हजार ८२० मेगावॅट विद्युत निर्मिती ठप्प होणार असली तरी, राज्यातील विद्युत पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध करुन दिली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले. कडाक्याच्या उन्हामुळे महावितरणकडे दररोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच ६, ७ व एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पाचा वाटा मिळून एकूण १,१४४ मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. तसेच पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि मागणी एवढी विजेची उपलब्धता असल्याने कोयनेच्या वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्रमांक ४ मधून विज निर्मिती पुर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले. कोयना धरणात बुधवार (दि. ५) अखेरीस ९.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. येत्या १५ जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यामुळे २९ मे पासून येथील टप्पा क्रमांक ४मधून वीज निर्मिती बंद केली आहे. चिपळूण आणि दाभोळ परिसरास पाणी पुरवठा करण्यासाठी टप्पा क्रमांक १, २ व ३ मधून कमी दाबाने वीज निर्मिती करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीकरणीय स्त्रोत यांचे सोबत दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. तसेच, विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झीरो शेड्यूल्डामध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्सचेंजवर वीज खरेदी करुन विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल. मात्र, कोयनेतील विद्युत निर्मिती बंद झाल्याचा परिणाम राज्यातील विज पुरवठ्यावर होणार नाही, असे महावितरणने सांगितले.--कोयना जलविद्युत प्रकल्पामधून १ हजार ९६० मेगावॅट विद्युत निर्मिती होते. त्यातील १ हजार ८२० मेगा वॅट विद्युत निर्मिती बंद आहे. या प्रकल्पातील ६०० मेगावॅट क्षमतेचे १ व २ टप्पा चोवीस तास चालवून त्यातून ४० मेगा वॅट आणि ३२० मेगावॅट क्षमतेच्या टप्पा क्रमांक ३ प्रकल्पातून ८० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. तर, चौथा टप्पा बंद ठेवण्यात येईल.
कोयना विद्युत निर्मितीचा वीज पुरवठ्यावर परिणाम नाही : महावितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 7:00 AM
पाण्याअभावी कोयनेची चौथ्या टप्प्यातील विद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे
ठळक मुद्देपाण्याअभावी १८२० मेगा वॅट वीज निर्मिती बंदकडाक्याच्या उन्हामुळे महावितरणकडे दररोज १९ ते १९,५०० मेगावॅट विजेची मागणी राज्यात कोठेही भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने केले स्पष्ट