परळ टर्मिनससाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
By admin | Published: May 17, 2016 05:36 AM2016-05-17T05:36:44+5:302016-05-17T05:36:44+5:30
दादर स्थानकावरील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबई : दादर स्थानकावरील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण करताच एका महिन्यात त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेस ट्रेनचा मार्ग सुकर होईल आणि रखडणारा लोकल प्रवासही थांबेल. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पातच परळ टर्मिनस बांधण्याचाही प्रस्ताव आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ८९0 कोटी रुपये खर्च होणार असून, यामध्ये परळ टर्मिनससाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, परेल टर्मिनसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या परळ स्थानकाजवळील एक जादा लाइन मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून रेल्वेच्या बांधकाम विभागाला देण्यात येईल. त्यानंतर ही लाइन तोडली जाईल. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. ही लाइन तोडून त्या ठिकाणी परळ टर्मिनसचा नवा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.