सप्तसूर पोरके झाले; आज राज्यात सार्वजनिक सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:05 AM2022-02-07T07:05:57+5:302022-02-07T07:07:14+5:30
स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
मुंबई : गेला महिनाभर दीदी येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कोरोना, न्यूमोनियाशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी आयुष्याची भैरवी पूर्ण केली. त्याचवेळी जगाच्या पाठीवर प्रत्येक मिनिटाला कुठेना कुठे दीदींचा सूर निनादत होता...
त्यांच्या पश्चात आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही चार भावंडे आणि अगणित चाहता परिवार आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. २२ जानेवारी रोजी त्या कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढण्यात आले; पण त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
अशी तिसरीच घटना -
स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
अपवादात्मक परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किंवा राज्य सरकारला आहेत. त्यानुसार, लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज राज्यात सार्वजनिक सुट्टी -
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात राज्य शासनातर्फे रविवारी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कलाविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद राहतील.
एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्यातून आपोआप पाणी येते; आमच्या दोघींमध्ये हेच एक साम्य होते...
माझी मते आणि तिची मते यात दोन टोकांचे अंतर आहे. मी बॉब करते. ती दोन वेण्या घालते. मी रुंद गळ्याचे ब्लाऊज घालते तर ती बंद गळ्याचे. ती सारखी पांढऱ्या रंगाचा पोशाख करते. तर मला गुलाबी रंग प्रिय. माझ्या तिच्या राहणीत, विचारात, फार फरक आहे. एवढेच काय, मी एकदम फटकळ, तर ती सगळे मनात ठेवणारी. ती बारीक सडसडीत, तर मी चांगली गरगरीत. ती नाजूक, सॅड गाणी गाते, तर मी सगळ्या ढंगांची गाणी गाते. ती म्हणते मी कलेसाठी जगते. मी म्हणते कला माझ्यासाठी आहे. सगळे म्हणतात, या दोघीजणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहिती नाही की या दोन्ही डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणाऱ्या नसा एकच आहेत. म्हणून एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्यातून आपोआप पाणी येते... - आशा भोसले