मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याचे आरोप विरोधी पक्ष भाजपा करत आहे. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठाकरेंची पाठराखण करत ते 14-14 तास काम करत असल्याचे म्हटले आहे. आता त्यामध्ये आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. त्या म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर.
कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच मंगेशकर यांनी डी वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, प्रमोद पाटील यांचेही आभार मानले आहेत. या भागातील रुग्ण सापडलेल्या इमारती वेळेत आणि प्रभावी उपाययोजना करून सील केल्याने कोरोना आटोक्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीला मदतज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यक निधीला २५ लाख रुपयांची मदत केली होती. त्यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. लता मंगेशकर यांनी ट्विट केले होते की, नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन केले होते.