Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचे आजोळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यात; घर पडलेय, पण पिंपळाचे झाड आजही आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:36 PM2022-02-06T16:36:59+5:302022-02-06T16:37:13+5:30
थाळनेर गावात लता दीदींच्या आई माई (शेवंती) मंगेशकर यांचे वडील हरिदास लाड राहायचे. माई मंगेशकर यांनी थाळनेरच्या शाळेत शिक्षणही घेतलं आहे.
जळगाव- भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लता मंगेशकर आणि धुळे जिल्ह्याचा एक ऋणानुबंध राहिला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गाव लता दीदींचं आजोळ आहे. याठिकाणी त्यांचे आजोबा हरिदास रामदास लाड राहत होते. आजही गावात त्यांच्या घराच्या खाणाखुणा नजरेस पडतात. लता दीदींच्या निधनाचं वृत्त कळताच थाळनेर गावावर एकच शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
थाळनेर गावात लता दीदींच्या आई माई (शेवंती) मंगेशकर यांचे वडील हरिदास लाड राहायचे. माई मंगेशकर यांनी थाळनेरच्या शाळेत शिक्षणही घेतलं आहे. हरिदास लाड हे संगीत क्षेत्रात काम करायचे. त्यांचं थाळनेरात चार खोल्यांचं घर होतं. सुमारे 70 ते 80 वर्षांपूर्वी त्यांनी हे घर थाळनेरातील परभत संपत कोळींना विकलं होतं. सध्या या घराची संपूर्ण पडझड झालीये. लता दीदींच्या कुटुंबातील कोणीही याठिकाणी राहत नाही.
आईच्या आठवणीनं हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली होती थाळनेरला भेट-
लता दीदींचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुमारे 18 ते 20 वर्षांपूर्वी थाळनेरला भेट दिली होती. आपल्या आजोळला भेट देण्यामागे त्यांचा खास हेतू होता. आई माई मंगेशकर यांनी घरासमोर लावलेले कडुलिंब आणि पिंपळ या झाडांना पाहण्यासाठी ते थाळनेरला आले होते. याठिकाणी त्यांनी थाळनेरचे रमणभाई शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर माई मंगेशकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेलाही भेट दिली होती. थाळनेर गावातील स्वयंभू गणपती आणि नदीतील महादेवाचंही त्यांनी दर्शन घेतलं होतं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांपैकी कुणीही याठिकाणी आलेलं नाही.
थाळनेरकरांनी जागवल्या आठवणी-
थाळनेर गावातील माजी उपसरपंच एकनाथसिंह जमादार, मोरेश्वर भावे, चेतन भारती, के. सी. पाटील, वसंतभाई गुजराथी यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. 24 एप्रिल 2007 रोजी पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमाला लतादीदींनी भेट दिली होती. या कार्यक्रमासाठी थाळनेर गावातील लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रम आटोपल्यानंतर लतादीदींनी थाळनेरकरांशी खास संवाद साधला होता, अशी आठवणही या सर्वांनी यावेळी सांगितली.