हसत हसतच त्याने ऐश्वर्य सोडलं अन् उपस्थितांचे डोळे पाणावले!
By admin | Published: May 11, 2015 11:34 PM2015-05-11T23:34:01+5:302015-05-11T23:34:01+5:30
सिध्दार्थच्या दीक्षेबाबत चर्चा सुरू होती. तो दिवस उजाडला. मुख्य दीक्षा सोहळ्याच्या दिवशी दीक्षार्थी सिध्दार्थ व नैतिक यांनी मंदिरात आपल्या ऐहिक जीवनातील शेवटचा अभिषेक केला.
रत्नागिरी : महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, राजस्थान येथून आलेल्या हजारो जैन बांधव आणि समोर एक गंभीरपणे विधी सुरु...विधी करणारा तरूण मनोभावे विधीत गुंतलेला तर समोरील जनसमुदायाच्या डोळ्याला मात्र रुमाल.. एक तरूण त्याच्या उमलत्या वयात ऐश्वर्य भोगण्याआधीच त्याचा त्याग करून आजपासून संन्यस्त आयुष्याला समर्पित झाला. रत्नागिरीतील सिध्दार्थ जैन या युवकाने रत्नागिरीतील कार्यक्रमात संन्यस्ताची दीक्षा घेतली.
गेले काही दिवस सिध्दार्थच्या दीक्षेबाबत चर्चा सुरू होती. अखेर तो दिवस उजाडला. आज मुख्य दीक्षा सोहळ्याच्या दिवशी सकाळी दीक्षार्थी सिध्दार्थ व नैतिक यांनी मंदिरात आपल्या ऐहिक जीवनातील शेवटचा अभिषेक केला. त्यानंतर सकाळी ७ वाजता सिध्दार्थने आपल्या ऐश्वर्याचा आणि घराचा औपचारिक त्याग केला. त्याच्यासह सुरत येथील दीक्षार्थी नैतिक सोनेथा असे दोन्ही दीक्षार्थी धनधान्य, घराचा त्याग करून मागे वळून न बघता घराच्या बाहेर पडले. गृहत्यागावेळी उपस्थित मंडळी रडत होती. मात्र, सिध्दार्थच्या घरातील मंडळींचे चेहरे निर्विकार होते.
दोन्ही दीक्षार्थींचे प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आगमन झाले. प्रभूपूजनानंतर दीक्षादान विधी सुरू झाला. विजय तिलक झाल्यावर दीक्षेनंतर घालावयाचे कपडे व उपकरण अर्पण करण्यात आले. त्यावेळी दोघांनीही नाचून आनंद व्यक्त केला. हा विधी सुरु असताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यानंतर दोन्ही दीक्षार्थी मंडपातून मुंडणासाठी बाहेर पडले. साधूवेशात सभामंडपात प्रवेश केल्यानंतर जनसमुदायाने जयजयकार करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर नामकरण विधी पार पडला. सिध्दार्थचे नवीन नाव जैनतीर्थशेखर विजयजी असे असून नैतिकचे नवीन नाव निर्विकारबोधि विजयजी असे नामकरण करण्यात आले.
सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर आचार्य अजितशेखर यांनी दोन्ही दीक्षीत मुनींना उपदेश दिला. पंचमहाव्रत म्हणजेच सत्य, अहिंसा, अचौर्य, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या तत्त्वांचे निष्ठेने पालन करण्याबद्दल उपदेश दिला. (प्रतिनिधी)
1सकाळी शुभमुहूर्तावरच सिध्दार्थ याने गृहत्याग करून आपली संन्यस्ताच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
2गृहत्याग करताना घरातील मंडळी साश्रूनयनांनी निरोप देतात. मात्र, सिध्दार्थचे कुटुंबीय निर्विकारपणे हे सारे पाहात होते.
3सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सिध्दार्थचे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आगमन झाले अन् विधीला सुरुवात झाली.