पती, पत्नीपैकी एकालाच रजा प्रवास सवलत
By admin | Published: June 11, 2015 01:33 AM2015-06-11T01:33:26+5:302015-06-11T01:33:26+5:30
राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा प्रवास सवलतीबाबतचे नवीन नियम आज वित्त विभागाने जारी केले. त्यानुसार पती आणि पत्नी दोघेही
मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा प्रवास सवलतीबाबतचे नवीन नियम आज वित्त विभागाने जारी केले. त्यानुसार पती आणि पत्नी दोघेही शासकीय सेवेत असतील तर त्यांच्यापैकी एकालाच कुटुंबीयांसह या सवलतीचा लाभ मिळेल.
यापूर्वी कर्मचाऱ्याचा गाव महाराष्ट्रात असेल तरच त्याला मुख्यालयापासून गावी जाण्याची प्रवास सवलत मिळत होती. आता राज्याबाहेर वा देशाबाहेरही कर्मचाऱ्याचा गाव असेल तरीही त्याला प्रवास सवलत मिळणार आहे.
प्रवास सवलत राज्याच्या भौगोलिक सीमेच्या आतमधील गावांसाठी दिली जाते. या सवलतीसाठी कमाल व किमान अंतराच्या प्रवासाची अट नसेल. मात्र, या सवलतीचे ठिकाण रजेच्या अर्जाद्वारे घोषित करणे तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वमान्यता घेणे आवश्यक असेल.
स्वग्राम म्हणजे कर्मचाऱ्याचे कायम वास्तव्याचे ठिकाण किंवा त्याच्या सेवापुस्तिकेत नोंदविलेला गाव किंवा मालकीची स्थावर मालमत्ता असलेले जवळच्या नातेवाइकांचे (आईवडील, भाऊ) रहिवासाचे गाव. या मूळ गावी जाण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रवास सवलत दिली जाते. शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत कर्मचाऱ्याने स्वग्राम घोषित करणे बंधनकारक असेल. या कालमर्यादेत स्वग्राम घोषित केलेले असेल तर आपल्या सेवाकाळात एकदा स्वग्राम बदलण्याची कर्मचाऱ्यांना संधी दिली जाणार आहे.