...तर हातभट्टी कायदेशीर करा : आठवले
By admin | Published: November 3, 2016 01:07 AM2016-11-03T01:07:12+5:302016-11-03T01:07:12+5:30
हातभट्ट्यांवर वारंवार कारवाई करूनदेखील त्या बंद होत नसतील, तर देशी दारू व इतर दारूप्रमाणे तिला कायदेशीर करावे
लोणावळा : हातभट्ट्यांवर वारंवार कारवाई करूनदेखील त्या बंद होत नसतील, तर देशी दारू व इतर दारूप्रमाणे तिला कायदेशीर करावे म्हणजे काळ्या पैशांचे रूपांतर पांढऱ्या पैशात होईल, असा उपरोधिक टोला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रशासनाला मारला.
‘‘हातभट्ट्यांवर वारंवार पोलीस कारवाई करतात. पण, त्या पुन्हा सुरू होतात. यामधून काळ्या पैशाला चालना मिळत आल्याने त्यांना नियमात बसवून कायदेशीर केले, तर शासनाच्या तिजोरीत भर पडेल, असा सल्लाही आठवले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना व गुन्हेगारीविषयी बोलताना आठवले म्हणाले, काही लोक जनावरांपेक्षाही जास्त विकृत वागत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे हे नाकारता येणार नाही.या गुन्हेगारांवर वचकासाठी यंत्रणेची गरज आहे. भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांत मागील दोन वर्षांपासून धुसफूस सुरू असून, दोघांनीही सबुरीने घ्यायला हवे असा सल्ला आठवले यांनी दिला. ते म्हणाले, आगामी २१२ नगर परिषदांच्या निवडणुकांना युतीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचे रावसाहेब दानवे व संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.