विधान परिषदेचे ‘अर्थ’कारण; बहीण-भावाचे राजकारण !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 07:21 PM2018-05-07T19:21:18+5:302018-05-07T19:21:18+5:30
अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे.
लातूर : स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे ‘मूल्य’ दिवसेंदिवस वाढत असून, इथे अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक मैदानही सध्या एकमेकांवरील कूरघोड्यांनी गाजत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली माघार अनेक अर्थाने प्रश्न उभे करणारी आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि लातूर भाजपाचे नेते रमेश कराड यांना पक्षात आपली बाजू मांडणाऱ्या बहिणीशिवाय दुसरे कोणी नाही, असे वाटले. अन् त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा पंकजातार्इंना धक्का असल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना पंकजातार्इंनी सुरेश धस यांच्यामुळे राष्ट्रवादीलाच धक्का असल्याचे म्हटले. दरम्यान, अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेले राजकीय नाट्य सर्वांनाच धक्का देणारे ठरले. त्यातही बहिणीकडून भावाला मोठा धक्का असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.
कराड यांना राष्ट्रवादीने पक्षात घेऊन बी फॉर्म दिला व उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, शेवटच्या क्षणी कराड यांनी घेतलेली माघार भाजपाला साह्यभूत ठरणारी आहे, असा एक तर्क लढविला जात आहे. प्रत्यक्षात भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्या पक्षाचा वनवास संपवून स्वगृही आलो म्हणजेच राष्ट्रवादीत आलो म्हणणारे रमेश कराड केवळ भाजपाचा मार्ग सुलभ व्हावा, या एकमेव कारणासाठी आपला राष्ट्रवादीकडून भरलेला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत.
राष्ट्रवादीने पक्षप्रवेश देताना उमेदवारीचे आश्वासन पाळले. त्यात राजकीय ‘मूल्य’ कुठे ढासळले, हे एकमेकांची तोंडे उघडल्यावरच कळणार आहे. बहीण-भावाची राजकीय कूरघोडी, मानलेल्या भावाचा धक्कादायक निर्णय या भोवती चर्चा होत असली तरी पडद्यामागे आणखी बरेच काही घडले आहे. त्याचा राजकीय धुरळा दीर्घकाळ उडत राहील.
दुरंगी लढतीकडे लक्ष...
भाजपा उमेदवार सुरेश धस विरुद्ध अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे अशी लढत होईल. राष्ट्रवादीने जगदाळे यांना पाठिंबा दिला. काँग्रेस सकारात्मक निर्णयाच्या वाटेवर आहे. आघाडीचा धर्म अपक्षाच्या पाठीशी राहिला तर भाजपाला याही स्थितीत तूल्यबळ टक्कर द्यावी लागेल. १००६ मतदारांच्या गाठीभेटी, पक्षांतर्गत कूरघोड्या कशा हाताळल्या जातील, यावर उमेदवारांच्या पदरी मतांचे मूल्य पडेल. एकंदर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील राजकीय गुंता वाढविणारी ही निवडणूक ठरली असून, कोण कोणाच्या पाठीशी आहे, स्वपक्षातही कोणाचे उट्टे काढले गेले, हे निकालानंतर कळेल.