बँकांनी फुगविलेल्या आकड्याची रिझर्व्ह बँकेकडे माहिती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:05 AM2017-10-18T05:05:30+5:302017-10-18T05:05:52+5:30
व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल...
मुंबई : व्यावसायिक बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदार शेतक-यांचे आकडे फुगवून सांगितले आहेत. त्यामुळे या बँकांनी आधी आणि नंतर दिलेली कर्जदारांची आकडेवारी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महिनाभरात सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा फायदा दिला जाईल; त्यानंतर ज्या बँकांनी मोठ्या प्रमाणात आधी आकडे फुगवून सांगितले आणि नंतर कमी केले त्याची शहानिशा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे व रिझर्व्ह बँकेकडे केली जाईल. मात्र, बँकांनी दिलेल्या या आकडेवारीवर विश्वास ठेवून कर्जमाफी दिली असती तर राज्यातील करदात्यांचा पैसा बोगस खात्यांमध्ये गेला असता. त्याला सरकारच्या निर्णयामुळे चाप लागल्याचाही दावा
मुख्यमंत्र्यांनी केला.
सहकारी व व्यावसायिक बँकांनी मिळून ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असे आधी सरकारला सांगितले होते. मात्र सरकारने थेट लाभधारक शेतक-यांकडून अर्ज भरून घेणे सुरू केल्यामुळे या बँकांचे पितळ उघडे पडले व पहिल्या टप्प्यात साडेतेरा लाख कर्जदार शेतक-यांची संख्या या बँकांनी कमी केली. हे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, आज आमचे प्राधान्य कर्जमाफीला आहे. उद्या कर्जमाफीच्या पहिल्या दिवशी १० लाख शेतक-यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल आणि येत्या नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
पूर्वी बँका राईट आॅफ केलेली खाती दाखवत आणि कर्जमाफीचे पैसे घेत असत, मात्र ते आता शक्य होणार नाही. मुंबईतील बँकांतून कृषी कर्ज घेतलेले जे लोक खरेच बाहेर शेती करीत असतील तर त्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पेपरतपासणी आॅनलाइनच
मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र निकालाबाबत जे काही घडले ते वाईटच होते, अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.
सोशल मीडियाचा गैरवापर
सोशल मीडियातून पंतप्रधान वा अन्य कोणावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट टाकणारे काही जण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दुष्प्रचार केला जात आहे. असे प्रकार करणा-यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगरचा कॉन्स्टेबल हा एका राजकीय पक्षाच्या पुढा-याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरून सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा-सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाविरुद्ध कारवाई केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील. कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘मी सुप्रिया सुळेंच्या भरवशावर फिरत नाही’
कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणी एक महिन्यात निकाल दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांच्या भरवशावर राज्यात फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्ये केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणे आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहे. राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.