भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू
By admin | Published: August 15, 2015 01:36 AM2015-08-15T01:36:01+5:302015-08-15T01:36:01+5:30
सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना
कऱ्हाड : सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय याला शिस्त लागणार नाही, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कऱ्हाड येथे आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, सहकार कायद्यात मध्यंतरी केलेले बदल घाईगडबडीत केले आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास सुरू असून लवकरच सहकार कायद्यात आवश्यक असणारे नवे बदल राज्य सरकार करणार आहे.
राज्यात आज अनेक संस्था चांगला आदर्श घालून देत आहेत. पण एक लाखाहून अधिक सहकारी संस्थांची फक्त उपनिबंधक कार्यालयात नोंद दिसते. प्रत्यक्षात काम मात्र दिसत नाही. अशा ‘पिशवी’तील संस्थांचा लवकरच शोध घेत असून, त्या बंद करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
शंभर कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ
सहकार क्षेत्रात गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. पण पाठीमागच्या सरकारने अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या चौकशी फाईलींवर कोणताच निर्णय न घेता सही करणे टाळले होते. पण मी सहकार मंत्री झाल्यानंतर अशा शंभरहून अधिक फाईलवर सह्या करून संबंधित कर्मचारी बडतर्फ केले आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
पतसंस्थांतील ठेवींना संरक्षण
राज्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठे आहे, पण तेथे ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांना ठेवींबाबत संरक्षण दिसत नाही. सहकार विभाग याचा बारकाईने अभ्यास करीत असून लवकरच पतसंस्थांतील ठेवींना संरक्षण देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.