सोशल डिस्टन्सिंग पाळताना मनाने एकत्र येऊ या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:27 AM2020-06-05T05:27:17+5:302020-06-05T05:27:37+5:30
अध्यात्मिक गुरूंचे विवेचन : लोकमत भक्ती वेबिनार ज्ञान सत्राला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अध्यात्मातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग जीवनात केला तर केवळ ती व्यक्तीच नव्हे तर समाज, राष्ट्र आणि पर्यायाने विश्व सुखी होईल. कोरोनासारख्या वैश्विक संकटावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळताना मनाने मात्र जवळ येऊ. वसुधैव कुटुंबकम ही परंपरा आपल्या राष्ट्रामध्ये निरंतर राहिली आहे, असे विवेचन आध्यात्मिक गुरू प्रल्हाद वामनराव पै आणि डॉ. शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी केले.
लोकमत भक्ती’ या व्यासपीठावर आयोजित केलेल्या खास वेबिनारमध्ये विद्वान अध्यात्मिक ज्ञानसत्रात प्रबोधन करताना जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै म्हणाले, सर्वांच्या सुखात आपले सुख आणि सर्वांच्या दु:खात आपले दु:ख मानले पाहिजे. फक्त मी सुखी होईन, असा विचार केला तर संघर्ष निर्माण होईल. कोरोनाशी लढताना आपल्याला डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी लागतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे. राष्ट्राप्रती असे जीवन जगणे म्हणजे परमार्थ. आपण जेव्हा समाजाचा आणि राष्ट्राचा विचार करतो तेव्हा समाज आपला विचार करू लागतो.
जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हा मिळवायचा असतो तर सुख अनुभवायचे असते. पैशाने सुख मिळत नाही, केवळ सुखसोयीच मिळतात. आपण सुखीच असतो मात्र आपणच आपल्याला दु:खी करतो. अध्यात्म, प्रपंच, समाज आणि राष्ट्र यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. सदगुरू वामनराव पै यांनी जीवनविद्या निर्माण केली त्याचा मुख्य उद्देश परमार्थ आणि प्रपंच यांचा सुरेख समन्वय कसा घडवून आणायचा, हे सांगण्याचा होता. संसार सुखाचा कळणे म्हणजे परमार्थ. आध्यात्माच्या पायावर प्रपंचाची इमारत उभी केली तर ती पक्की होते. जीवनाची दिशा ‘मै नही, हम’ अशी असली पाहिजे. आपले काम प्रामाणिकपणे मनापासून करताना सर्वांचे भले होऊ द्या, हा विचार केला पाहिजे. जीवनात आपण कर्म करतो त्याचे फळ कित्येक पटींमध्ये आपल्याला मिळते. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट येईल याची चिंता करण्यापेक्षा आपल्यातील कौशल्याचा विकास करा. सतत कृतीशिल राहा आणि जेथे काम
करीत असाल त्या संस्थेची भरभराट होवो, असा विचार करा. त्याचे
फळ मिळतेच, असे मार्गदशैन पै यांनी केले.
आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. शंकर वासुदेव अभ्यंकर यावेळी म्हणाले, भारतीय संस्कृती उदात्त आणि व्यापक आहे. भारतीय संस्कृती निरंतर विश्वाचा विचार करते. हजारो वर्षांपूर्वी ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना केवळ इथे रूजली होती, असे नव्हे तर भारतीय तिचे आचरण करीत होते. हे सगळे जग एका कुटुंबासारखे आहे. आज या घराला एका वैश्विक महामारीने घेरलेले आहे. मानवजातीवर भयंकर संकट कोसळले आहे. सगळे देश म्हणजे एक घरच आहे. भारताने सदैव विश्वाच्या कल्याणाचा विचार केला आहे. हे करत असताना आपल्या राष्ट्राने ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय सदैव ठेवला आहे.
सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या ज्ञान सत्राचे सूत्रसंचालन केले.
काही संकटे जगातील अशी असतात की त्याचा प्रतिकार करताना तारतम्य, विवेक, विचार याचे भान नित्य ठेवावे लागते. वैश्विक महामारी विश्वावर कोसळली असताना अशा वेळेला सोशल डिस्टन्सिंग हे शस्त्र वापरणे अत्यावश्यक आहे.
कोरोनाच्या भयाने घरात राहून माणसे कंटाळली आहेत. अशावेळेला मार्गदर्शन करते ते अध्यात्म. जो स्वार्थी मनुष्य असतो तो नेहमी म्हणतो, मी. फक्त मी. जे समाजाचा आणि राष्ट्राचा विचार करतात, ते म्हणतात, आम्ही. जे अध्यात्माचा विचार करतात ते विश्वात्मकच विचार करतात. म्हणून ते म्हणतात, आपण. असे आपण म्हणायला शिकणे आणि
तसे वर्तन असणे याला म्हणायचे अध्यात्म.
स्वत:पासून वर जाऊन स्वार्थाचा विचार टाकून, समाज राष्ट्राचा विचार करून शेवटी मानवतेपर्यंत पोहचणे म्हणजे अध्यात्म. अध्यात्मक संयम शिकवते. सहनशीलता बाणवते. अध्यात्माशिवाय मानवी जीवन असू शकत नाही. अमरपट्टा घेऊन कुणी जन्माला येत नाही. आयुष्य कसे जगावे हे अध्यात्म शिकवते, अशा शब्दात डॉ. अभ्यंकर यांनी अध्यात्माची व्याख्या अनेक उदाहरणे देत स्पष्ट केली.
यू ट्युब चॅनेलवर पहाण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/0NuarC_mwpE