मुंबई : ‘मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची कटिबद्धता आहे. ते आम्ही देणारच. राज्यकर्ते म्हणून ते आमचे कामच आहे; पण या विषयाच्या अनुषंगाने सामाजिक सलोखा ठेवण्याची जबाबदारी फक्त आमची नाही, तर समाजातील सर्वांचीच आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणावर भाष्य केले. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला कोणी संरक्षण दिले, हे समोर आलेच आहे. आता या गुन्ह्याचे मूळ कुठे आहे, तेही शोधून काढू,’ असेही ते म्हणाले.
पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे ही आमची जबाबदारी आहे, असे सांगितले आहे. त्यावर कायदेशीरदृष्ट्या जे काही करणे आवश्यक आहे ते आम्ही करीत आहोत. ओबीसी समाजालाही मुख्यमंत्र्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देणे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्यच आहे. मात्र, त्याचवेळी सामाजिक सलोखा बिघडू नये, ही जबाबदारी सर्वांचीच आहे.