ब्रिटिश कंपनीने भारत सरकारला दिले पत्र; सांगितले भीमा नदीवरील पुलाचे आयुष्य संपले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:18 PM2019-05-13T15:18:22+5:302019-05-13T15:19:12+5:30
डिकसळचा पुल बनला धोकादायक; तरीही जडवाहतुक नियमितपणे सुरूच
नासीर कबीर
करमाळा : सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यास जोडणारा भीमा नदीवर ब्रिटिशांनी १८५५ साली डिकसळचा पूल बांधला. त्या पुलास आज १६४ वर्षे पूर्ण झाली असून, पुलाचे आयुष्य सन २००० सालात संपल्याचे ब्रिटिश कंपनीने भारत सरकारला पत्राव्दारे कळवले आहे. तरीही गेल्या १८ वर्षांपासून डिकसळच्या पुलावरून जडवाहतूक सुरूच आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटच झालेले नाही. त्यामुळे डिकसळचा पूल धोक्याचा रे बाबा..ऽऽ असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे.
या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा उपयोग करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं.१, २, वाशिंबे, गोयेगाव, कुुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी ३५ गावातील लोक पुणे जिल्ह्यात जवळच्या मार्गाने जाण्यासाठी करत आहेत.
या ब्रिटिशकालीन पुलाची देखभाल दुरूस्ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. पुलाचे आयुष्य तब्बल १६४ वर्षे झाले आहे. पुलाचे मॅपिंग सपोर्ट कमकुवत बनले असून ठिकठिकाणी पुलाच्या भिंतीस तडे जाऊन झाडे उगवली आहेत.
डिकसळ पुलावरून जड वाहनास जा-ये करण्यासाठी बंदी असूनही सर्रास वाळूच्या गाड्यांची वाहतूक होत असते. साखर कारखान्याकडे उसाची वाहतूकही याच पुलावरून नियमित होते. पुलाच्या दोन्ही बाजूने जडवाहनास जाता येऊ नये म्हणून लोखंडी बॅरिकेड लावूनही त्या बॅरिकेडला वळसा मारून बेमालूमपणे जीवाची पर्वा न करता जड वाहतूक सुरू आहे.
करमाळा ते जामखेड जिल्हा मार्गावरील पोथरे नजीक कान्होळा नदीवरील पूल, उस्मानाबाद-दौंड राज्यमार्गवरील वीट येथील पूल व वीट ते अंजनडोह मार्गावरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट नुकतेच झाले आहे. असे सार्वजनिक बांधकाम करमाळा उपविभाग चे उपकार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी ंसांगितले.
असा आहे पुलाचा इतिहास
- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सीमेवर डिकसळ येथे तब्बल अर्धा कि.मी. लांबीचा डिकसळचा पूल दक्षिणोत्तर रेल्वे मार्ग जोडण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला. या पुलावरून १९७० पर्यंत रेल्वे धावली. पुढच्या काळात रेल्वेचा मार्ग खानोटा ते भिगवण रेल्वेने बांधलेल्या पुलावरून वळविण्यात आला.
धोका वाढलाय..
- आजतागायत ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा उपयोग करमाळा तालुक्यातील ३५ गावचे नागरिक करीत आहेत. आता तर कोर्टी ते टाकळी हा ३० कि.मी.चा रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून चकाचक झाल्याने संपूर्ण करमाळा तालुक्यातून पुण्याकडे भिगवणमार्गे जाणारी वाहतूक याच डिकसळ पुलावरून सुरू झाली आहे.
ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखभालीखाली येत असून गेल्या पाच वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल आॅडिट झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट होते. डिकसळच्या पुलावरून जडवाहतुकीस बंदी आहे.
- एस.एल. माने, बांधकाम अभियंता, जि.प.उपविभाग, करमाळा