आयुक्तांच्या भेटीने उडाली तारांबळ
By admin | Published: January 24, 2015 01:59 AM2015-01-24T01:59:53+5:302015-01-24T01:59:53+5:30
राज्यातील आरटीओ दलालमुक्त करण्याचा ‘विडा’ उचललेले परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओंना अचानक भेट देण्यास सुरुवात केली
मुंबई : राज्यातील आरटीओ दलालमुक्त करण्याचा ‘विडा’ उचललेले परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओंना अचानक भेट देण्यास सुरुवात केली असून, त्यांनी शुक्रवारी पहिलीच भेट वडाळा आरटीओला दिली आणि त्यांच्या या अचानक भेटीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह सगळ्यांची एकच धावपळ उडाली.
या धावपळीत परिवहन आयुक्तांनी पळणाऱ्या रिक्षा संघटनेच्या एका प्रतिनिधीला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. आरटीओत कामानिमित्त येणाऱ्यांकडे एक किंवा दोनपेक्षा जास्त कागदपत्रे नको, असे आदेश परिवहन आयुक्तांनी आरटीओंना दिलेले असतानाच या प्रतिनिधीकडे दहापेक्षा जास्त बॅज बनविण्यासाठी लागणारे कागदपत्रे आढळली. संबंधित प्रतिनिधीविरोधात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आल्याचे वडाळा आरटीओकडून सांगण्यात आले.
आरटीओतून दलाल हटविण्याचे आदेश परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. १७ जानेवारीपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देतानाच १९ जानेवारीपासून आरटीओंना अचानक भेट देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. या भेटीत दलाल आढळल्यास संबंधित आरटीओ अधिकाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीदही दिली होती. मात्र चार दिवसांत झगडे यांनी कुठल्याही आरटीओला अचानक भेट दिली नव्हती. त्यामुळे परिवहन आयुक्त भेट कधी देणार अशी उत्सुकता लागून असतानाच एक प्रकारची भीतीही त्यांच्यात होती. यासाठी सर्व आरटीओ अधिकाऱ्यांनी दलालाने शिरकाव करू नये आणि कामकाजही सुरळीत राहावे यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. चार दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झगडे यांनी वडाळा आरटीओला अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी वडाळा आरटीओत नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला आणि कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या फॉर्मच्या उपलब्धतेबद्दल माहितीही घेतली. या भेटीदरम्यान रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणाऱ्या संगणकीय चाचणी कक्षास भेट देतानाच चाचणीमध्ये अवलंबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेचीही माहिती घेतली. या वेळी कार्यालयातच पळापळ करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी संघर्ष संघटनेच्या एका प्रतिनिधीची झडतीही घेतली. या प्रतिनिधीकडे रिक्षा आणि टॅक्सी बॅज बनविण्यासाठी लागणारी दहापेक्षा जास्त कागदपत्रे आढळली. या कागदपत्रांच्या आधारे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आल्याचे वडाळाचे परिवहन प्रादेशिक अधिकारी बी. अजरी यांनी सांगितले.
अनेक बाबींचा आढावा
पूर्व उपनगरातील नागरिकांना अद्ययावत कार्यालय मिळावे यासाठी विक्रोळी-घाटकोपर येथील जागेच्या प्रकरणाचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच एमएमआरडीए येथील इतर इमारती परिवहन सेवेसाठी वापरण्यासंबंधी तात्पुरत्या स्वरूपात घेण्याबद्दलच्या बाबींचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष जागेस भेट देऊन घेतला.