Rally Supporting Sambhaji Bhide : प्रकाश आंबेडकरांना अटक करा, भिडे समर्थकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 10:41 AM2018-03-28T10:41:48+5:302018-03-28T12:39:53+5:30
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते.
मुंबई/पुणे/सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजी भिडेंवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी रस्त्यावर उतरले होते.
सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला तर पुण्यातील मोर्चामध्ये कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फंटागळेची आईदेखील सहभागी झाली होती. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
व्हिडीओ : राहुल फंटागळेच्या आईचा आक्रोश
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या होत्या मागण्या
1. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत.
2. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.
3. पुण्यातील एल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी
4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा.
5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारणाऱ्यांकडूनच करावी.
6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी
या ठिकाणी करण्यात आले होते मोर्चांचे आयोजन
- सांगली
राजमतीभवन नेमिनाथनगर तें जिल्हाधिकारी कार्यालय
- कोल्हापूर
बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
- सोलापूर
चार पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय
- सातारा
राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय
- पुणे
लालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालय
- मुंबई
आझाद मैदान
- यवतमाळ
बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय
- जळगाव
शिवतीर्थ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
- बेळगाव
श्रीसंभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
- नाशिक
अनंत कान्हेरे मैदान तें जिल्हाधिकारी कार्यालय
- गोंदिया
श्रीशिवप्रतिष्ठान जिल्हा कार्यालय तें जिल्हाधिकारी कार्यालय
- महाड दुर्गदुर्गेश्वर रायगड
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत कार्यालय महाड
- सिंधुदुर्ग
ओरस गाव ते जिल्हाधिकारी कार्यालय
UPDATES -
- संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा, पुण्यातील मोर्चाची सांगता
11:51 AM पुणे : संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्यातील लोकांनी अॅम्ब्युलन्सला वाट देत संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
11:49 AM पुणे :कोरेगाव भीमा प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगरे यांची आई जनाबाई फटांगरे यांनी बोलताना राहुलच्या मृत्यूला दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली.
पुणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा. ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात आंदोलनास सुरुवात